Monday 30 December 2013

उळळागड्डी , एक अप्रतिम एकांकिका


नुकतच पुरोषोत्तम करंडक आणि इतर राज्य स्पर्धेत ह्या वर्षी अव्वल ठरलेली एकांकिका 'उळळागड्डी' पाहण्याचा योग आला. बरेचसे प्रेक्षक विचारत होते "उळळागड्डी म्हणजे काय हो?". कोणी विचारत होतं , " काय हो विनोदी आहे का एकांकिका?". पण आम्हीहि केवळ पुरोषोत्तम करंडक  विजेती आणि उत्सुकता यापोटीच आलो होतो, यापलीकडे काहीच माहित नव्हतं.
एकांकिका खरं तर दिलेल्या वेळेपेक्ष्या बऱ्याच उशिराने सुरु झाली त्यामुळे प्रेक्षक खूप वैतागले होते. त्या नाराजी मुळे प्रेक्षकांनी विनाकारण टाळ्या वाजऊन संयोजकांना हैराण करून सोडलं होतं. उठून निघून घरी येण्याचे विचारहि मनामध्ये येत होते (विनामूल्य असल्यामुळे). आणि बरेचसे लोक निघून गेलेही . पण तसं केलं नाही हे चांगलंच झालं असं एकांकिका बघून नक्कीच वाटलं.
पुरोषोत्तम करंडक म्हटले कि तरुणाई आणि दंगा हा असणारच हे समीकरण माहितच होतं. एकांकिका सुरू झाली , पाहिलं एक दृश्य थोडसं गोंगाटातच गेलं. पण नंतर जेंव्हा साउंड वगैरे चांगला झाला आणि जसं ते पूरांच
दृश्य समोर आलं तसं सगळं पब्लिक एकदम हाताची घडी तोंडावर बोट ह्या स्टेज ला आलं आणि एकदम पिन ड्रोप सायलेन्स झाला. सगळे थक्क होऊन पुढंच दृश्य बघत होते. पुरामध्ये अडकल्यामुळे एक मुलगी आणि
तिचा काका शोभेल असा एक इसम, एका झाडावर  जगण्यासाठी धडपडतयात. खाली जोराचा प्रवाह आहे, विजा चमकतायत , ढगांचा गडगडाट आहे. केवळ अप्रतिम असं दृश्य. आणि कोण तरी एक रसिक प्रेक्षक भानावर येऊन टाळी वाजवतो आणि पूर्ण थेटर त्याचं अनुकरण करतं. नेपथ्य खूप आवडल्याची ती खुणच म्हणावी लागेल.
तर सुरुवात तर तुम्हाला कळलीच आहे. पूर्ण एकांकिका अशींच न सांगता. तुम्हाला फक्त मला जे आवडले ते सांगतो.
गोष्ट आहे दोन व्यक्तींवर एक १५,१६ वर्षांची मुलगी आणि तिचा काका शोभेल असा इसम हे एका पुरामध्ये एका झाडावर अडकतात. तो इसम आहे मराठी आणि ती मुलगी कानडी त्यामुळे दोघांचंहि बोललेलं एकमेकांना प्रथम काही कळत नाही. पण ज्या काही सहजतेने दिग्दर्शक त्यांना हाताळतो आणि अगदी साध्या संवादाने त्यांचं संभाषण जस पुढे जातं तसं त्या दोघांना एकमेकांच्या भाषेचे काही शब्द कळायला लागतात. हे इतक्या जलद घडत तरीही आपल्याला त्याबद्दल आक्षेप  राहत नाही. उलट आपण ह्या भाषा गोंधळामुळे अजूनच हुरुप येऊन पाहतो. आणि त्यात चांगली विनोदाची पेरणी करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.
अजून एक आवर्जून सांगावा असा प्रसंग म्हणजे त्या मुलीला भूक लागलेली असते आणि तो इसम पाण्यामध्ये अडकलेल्या काट्या, कुपाटयात काही तरी खायला मिळतय का? हे शोधत असताना एका तरुणीचा मृतदेह वर येतो तो क्षण नक्कीच आपल्याला घाबरवून सोडतो.
काही खायला मिळतंय का? हे शोधतांना त्या इसमाला खराब झालेला, कोंब वगैरे फुटलेला 'उळळागड्डी' सापडतो. पण तरीही तो तसाच आपल्या खिश्यात ठेवतो.
ती दोघं एक रात्र त्याच झाडावर काढतात. तोपर्यंत त्या दोघांचेही खूप हाल झालेले असतात. दुसऱ्या दिवशी मुलीला ताप वगैरे आला असल्यामुळे ती तो 'उळळागड्डी' खायला मागते.
नंतर सुदैवाने त्या दोघांची सुटका एक हेलीकॉप्टर करतं आणि ती दोघं सुखरूप सुटतात तोपर्यंत त्या दोघांचं एक अनामिक नातं तयार झालेलं असतं कि तो इसम तिला आपल्या घरी येण्यास विचारतो. पण शेवटी काय होतं हे मी इथे सांगत नाही. ते तुम्ही जाऊन बघावं हेच उचित. आणि हो शेवट हि छानच केला आहे.
म्हटलं तर एकांकिकेला दिलेलं नाव 'उळळागड्डी' योग्य वाटतं म्हटलं तर त्यात तसा काही अर्थही नाही. तरी पण नक्कीच आपल्या मनात 'उळळागड्डी' बद्दल एक वेगळीच आपुलकीची भावना तयार होते आणि दिलेल नाव योग्यच वाटतं.
दोघांचा हि अभिनय अप्रतिम आहे. भाषा भेदामुळे होणारे विनोद हसवतात. आणि सर्वात जमेची बाजू म्हणजे एकांकिकेचे नेपथ्य आणि प्रकाश योजना. पाण्याचा प्रवाह , अडकलेले काटे वगैरे त्यांनी फार छान उभं केलंय. (फक्त ह्याच्यासाठी एकदा तरी पहावी) ह्या दोन्हीतही त्यांना आपण पैकी च्या पैक्की मार्क देऊन टाकतो, आणि एक सुंदर, अप्रतिम असा अनुभव घेऊन विचार करतच थेटरच्या बाहेर पडतो.

(वरील प्रयत्नाला परीक्षण समजू नये. हे लिखाण केवळ ज्या लोकांना एकांकिकेबद्दल  माहित नाही आणि जे बघण्यास इच्छुक आहेत त्यांच्या साठी ओळख म्हणून लिहिलंय. आणि काही उणे असेल तर ते लिखाणाचा दोष समजावा. कारण एकांकिका फारच सुंदर आहे आणि कदाचित मला ती सांगताना झेपली नसल्याची शक्यताहि नाकारता येत नाही. )

 

Tuesday 26 November 2013

'आधारा' ची रात्र

"उद्याच्याला आपल्या गावात आंधाराची रात हाये हो... ओ ओ ओ..."
"तरी समद्यांनी उद्या सांच्याला ७ वाज्त्ता चावडीवर हजर राहंच हाये हो ...ओ ओ ओ..."
"येताना समद्यांनी विलेक्शन कारड आनाचं हाये हो.... ओ ओ ओ..."
म्हादूनं हलगी वाजवत दवंडी द्यायला सुरुवात केली तसं चावडी जवळ खेळणारी पोरं सगळी खेळ थांबवून एकमेकाकडे बघून हसायला लागली. त्याचं कारण हि तसच होतं, त्यांनी त्यांच्या उभ्या जन्मात दवंडी कधी ऐकली नव्हती. जवळ जवळ सगळ्याच पोरांना हि गोष्ट नवीन होती.
म्हादू जसा चावडीकडून पुढ निघाला तसं सगळे पोरं एखादी नं बघितलेली गाडी गावात आल्यावर कसं मागे जातात. तसं त्याच्या मागे जायला लागली. तर इकडे चावडी वर बसलेल्यांना चरायला नवीन कुरण मिळालं.
"हि आणि कोणची रात मनायची?" गुरव आप्पानि मांडी घालून अवघडलेले पाय लांब करत पहिलं पिल्लू सोडलं.
"कोंच कि गीऱ्हान हाय कि मनं, त्यची रात आसल" ढमालेच्या बाबुदानं आपलं ज्ञान पाजळलं.
" पर म्या मनतो गीऱ्हानाला विलेक्शन कारड कश्यापाई फाहीजे" गणूतात्यानं रास्त शंका उपस्थित केली तशी बसलेली सगळी मंडळी हसायला लागली.
"आरं ती ग्रहणाची रात् नाही रं, ते आधार कार्ड काडन्यासाठी लोकं येणारायात, त्यची दवंडी हाय" आपल्या डोक्यावरच्या टोपिनं कपाळावरचा घाम पुसून मोठे आप्पा बोलले.
मोठे आप्पा म्हणजे चार बुकं शिकलेला माणूस होता. वरिष्ठ मंडळींच्यात त्यांची वट होती. सगळे गावकरी त्याचं ऐकायचे त्यांनी सांगितलेली कोणतीही गोष्ट खोटी असूच शकत नाही असा सगळ्यांचा समज असायचा. तशी ती आजहि खरीच होती. गावामध्ये आधार कार्ड काढण्यासाठी लोकं येणार होते. आणि त्याचीच दवंडी देत म्हादू गावातनं फिरत होता.
" पण हे दवंडीच नवीनच बघतूय कि" मोठ्या आप्पानि शंका उपस्थित केली.
" सरपंचानच सांगितलंय दवंडी द्यायला, हलगी नीट करून घेतलेत. इतून फुड आता गावात हलगी वाजणार बगा, अन म्हाद्याला काई काम नसतंय म्हणून दिलंय आपलं कामाला लाऊन ."
तंबाकुची थुंकी तोंडात सावरत वरच्या आळीचे नाना बोलले अन बोलून झाल्यावर त्यांनी एक लांब पिंक टाकली. नानांची हि खासियतच होती तोंडात तंबाकू असतानाच फक्त ते बोलायचे. पिंक बाहेर टाकली कि गप गुमान बसायचे. त्यांच्या ह्या सवयीला ओळखून नानांनी पिंक टाकली तसं बाबुदा बोलले.
"आरं पर हे येडं आंधाराची रात , आंधाराची रात करत फिरतंया कि. मी मनतो लोकायला कसं कळणार कश्याची रात हाये ते.?"
" मंग आणि काय, लोकं तर म्हण्तील रोजचं आंधार असतुया कि रातच्याला, उद्याच्याला काय नवीन हाय मंग" मोठ्या आप्पांची शंका रास्त होती.
म्हादू गावातनं फिरत होता अन गल्ली गल्ली मध्ये पोरं सोरं , गडी माणसं, बायका त्याला भंडावून सोडत होत्या कि "बाबा रोजच तर अंधार असतोय कि रात्री. मग उद्या आनी काय विशेष".
पण लोकांच्या या प्रश्नावर म्हादूकडे उत्तर नव्हतं. तो आपला प्रत्येक गावात जसा "सांग काम्या हो नाम्या" माणूस असतो, तसाच होता. 
पण दुसऱ्या वेळेला मात्र म्हादूने दवंडी देण्याच्या अगोदर गावात नेमकं काय येणार आहे हे सरपंचाकडून नीट समजून घेतलं आणि चोख काम केलं. आता गावातल्या सर्व लोकांना कळालं होतं कि गावात आधार कार्ड येणार म्हणून.

गावात सकाळ संध्याकाळ दोन वेळा दवंडी देऊन झाली. आधार कार्ड येणार म्हणल्यावर त्याची चर्चा झाल्याशिवाय थोडीच राहतेय. प्रत्येक घरा घरात त्या रात्री एकच चर्चा होती ती म्हणजे आधार कार्ड.
 
" म्या नायी यणार बाई ते आदार का फिदार कारड काडायला." बायजाक्का अंगणात बसलेल्या आपल्या लेकाला उद्देशून म्हणाली.
" कामून ते."
"ती शिन्द्यायची संगी मनत व्हती ते काई बाई डोल्यात घालत्यात मनं अन हातालाबी काय्की लावत्यात, त्यनं कोनचा कि रोग व्हतया मनं."
"कायी रोग अन फिग व्हत नस्तया, ती संगी एक सांगणार अन तू ऐकणार".
"हामच्या बुढयायच्या अरद्या गवऱ्या मस्नात गेल्यावर काय काडलया या सरकारनं बी"  बायजाक्का लेकाला उद्देशून म्हणाली खरी पण लेक काही ऐकून घायच्या मनस्थितीत नव्हता. तेव्हा तिनं आपलं आपलंच बडबडनं चालू ठेवलं.
 
घरा घरात थोड्या बहुत फरकाने हीच अवस्था होती. कोणी उत्सुक होतं तर कोणी भीत होतं. ज्या काही थोड्या फार मंडळीना माहित होतं, त्यांना निदान आजच्या पुरती तरी गावात मागणी होती.  ती सगळ्यांना समजावून सांगत होती कि हे नेमकं काय आहे आणि ह्याचं काम कुठे पडतंय ते.
 
बघता बघता दिवस सरला अन दुसरा दिवस उजाडला. दिवस कासराभर वर आला तसं उपसरपंच सुदाम भाऊंनी कार्यकर्त्यांची मीटिंग बोलावली. मीटिंग मधल्या प्रत्येकाला वाटत होतं कि आधार कार्डा बद्दल काही असेल पण प्रकरण थोडं वेगळ होतं.
उपसरपंचान्नी त्यांच्या खास शैलीत म्हणजे प्रत्येक वाक्याच्या शेवटच्या शब्दावर जोर देत, लांब हेल काढत सुरुवात केली.
"मंडळी आज आपल्या गावामंदी, आपल्या पार्टीचे जिल्ल्याचे अध्यक्ष बंडू दादा काठीकवडे यणार हायेत. अनि त्यायला खुश ठेवाची वरूनच आडर हाये. त्यामुळं रातच्याला कोंबडी, बिम्बडीचा बेत हाये. तर आपल्या कार्यकर्त्यांयनी कुट उंडारायचं नायि, समदा कार्यकरम नीट झाला पाहिजेल, नायी तर पुडच्या येळेला तिकीट मिळणार नायी अशी आडर हाये." 
भाऊंचं भाषण संपलं तसं सगळया कार्यकर्त्यांचे डोळे बघण्यासारखे झाले होते. प्रत्येक जन हर्ष उल्हासाने न्हाऊन गेला होता.
त्यांना माहित होतं कि हे काठीकवडे  आणि त्यांची मंडळी म्हणजे फुल पेताड. दर वेळी प्रमाणे पिऊन नुसता दंगा घालणार.  म्हणजे जे काही कोंबडी वगैरे संपवायचं काम आहे ते त्यांच्यावरच येऊन पडेल. ह्या विचारांनी त्यांच्या पोटात गुदगुल्या होत होत्या.
"भाऊ ते समंद हामि करू वो, पर आज ते आधार कारड वाले पण यणार हायेत मनं त्यायचाबी जरा बंदोबस्त करायला पाहिजेल असं आन्ना मनत व्हते." आपल्या चेहऱ्यावरचा आनंद लपवत पक्यानं आपली शंका बोलून दाखवली तसे भाऊ उचकले.
" त्यायला काय घरं दारं न्हाईत व्ह्य रं, मोटा आलाय आदार वाल्यायचा कैवारी."
"पर आन्ना मनत व्हते कि ते आपल्याला सोय व्हावी मनून रातच्याला यणार हायेत, दिसभर गावात कोण नसतंय समदे आपआपल्या रानायमंदी असत्यात तवा त्यायनीच मनले मनं कि आमी रातच्याला यतो मनून, तवा आपल्यालाबी त्यायची सोय बगावी लागल." पक्क्याने आन्नांचा विचार मांडला.
"ह..वो बाबू त्यायच्यातलाच एक बग अन घे जावई करून" भाऊ आता भलतेच गरम झाले होते.
भाऊंचा राग बघून पक्या आणि मंडळी गप गुमान भाऊंचा निरोप घेऊन तिथून सटकले.
कामं खूप होती अन वेळ थोडा. मी कंट्री, तू फॉरेन आणि तो कोंबडी असं  विभाजन करून मंडळीनि आपापसात कामं वाटून घेतली, अन कामाला लागली.
खरं तर आधार वाल्यांसोबत भाऊंची काय दुष्मनी नव्हती. पण आन्ना म्हणाले म्हणून त्यांना उलट जायचंच , हा भाऊंचा शिरस्ता होता. भाऊंना मागे पाडून आन्ना सरपंच झाले होते हा राग त्यांच्या मनात अजून खदखदत होता, म्हणून आन्नांच्या गैरहजेरीत भाऊ सरपंच आन्नाच्या वर राग राग करत.
 
हा हा म्हणता म्हणता संध्याकाळ झाली. अन एकदाचे दोन मोटरसायकल वर चार जण आधार कार्डच्या किटा घेऊन गावात हजर झाले. त्यांच्या अवतारावरूनच वाटत होतं कि मंडळी खूप लांबच्या पल्ल्यावरून आली आहे. कपड्या, केसांवर नुसती धूळ साचली होती, प्रत्येकजण प्रवासाने शिणलेला दिसत होता.
गावात आल्या आल्या त्यांच्यातल्या एकाने गाडी थांबवून एका माणसाला सरपंचाच घर विचारलं.
त्या बहादरानं पण सरपंचाच घर नं सांगता त्यांची व्यवस्था चावडीमागच्या शामियान्यात केल्याच सांगितलं. तसं सगळे तिकडेच निघाले.
कार्यकर्त्यानी बंडू दादा येणार म्हणून सगळी जय्यत तयारी केली होती. एक छोटासा शामियाना बरोब्बर चावडीच्या मागच्या बाजूला उभारला होता. त्याला चारही बाजूंनी कोणाला दिसू नये म्हणून पडदे वगैरे लावले होते. सहसा तिकडे कोण गावकरी जात नसत आणि रात्री तर काळ कुत्र पण फिरकत नसे. अंगणवाडीची खोली चावडीला लागुनच पण चावडीच्या विरुद्ध दिशेला होती. तिच्यात सगळ्या गाद्यालोड वगैंरे ची जय्यत तयारी होती.  शामियाना आणि बाकीची व्यवस्था बघून आधार वाल्यांचा साहेबतर जाम खुश झाला. पण हि खुशी जास्त वेळ त्याच्या चेहऱ्यावर टिकली नाही.
कारण उपसरपंचाचं तेवढ्यात आगमन झालं होतं आणि आल्याआल्या त्यांनी विचारलं.
"काय मंडळी कस काय वाट चुकला आमच्या गावाकड?"
"आम्ही आधार कार्ड वाले आहोत, आपण कोण?" साहेबांनी सभ्य भाषेत विचारलं.
"हामि व्हय, म्या उपसरपंच हाय गावचासुदाम भाऊ म्हणत्यात मला"  उपसरपंच जरा गुर्मीतच बोलले.
" रात्री सगळे गावकरी इथेच जमणार असं दिसतंय." साहेब शामियान्याकडे हात दाखवत एवढं बोलणार कि लगेच सुदाम भाऊ त्याला आडवत बोलले.
"काय, यड का खुळ तुम्ही आं, ते जिल्ल्याचे पुढारी येणारेत त्यायच्यासाठी केलंय हे समदं."
"ओ तुम्ही जरा नीट बोला, कोणाला बोलताय माहित आहे का?"
वेडा म्हटल्यामुळे साहेब जरा दुखावल्याच गेले होते.
"ठीकाय ठीकाय, तुमची यवस्था तिकडं केली असल बघा चावडीकड" सुदाम भाऊ अजून तेठच होते.
भाऊ एवढं बोलणार तेवढ्यात पक्क्या तिथं येऊन हजर झाला. त्याने तिथ काय झालं हे साहेबांच्या तोंडावरून हेरलं अन पटकन आधार कार्ड वाल्या मंडळीची चावडी कडे नेऊन सगळी व्यवस्था लावली.
वणव्यासारखी गावात बातमी पसरली कि आधार कार्ड आलं आणि चावडीकडे गावकऱ्यांची इलेक्शन कार्ड, पोरांचे जन्माचे दाखले हे सगळं घेऊन झुंबड उडाली.
चावडीसमोरच्या सभागृहात सगळं गाव जमा झालं होतं. गावाची लोकसंख्या पाच सहाशे च्या घरात होती आणि सध्या नाही नाही म्हणलं तरी चारशे बाई, माणूस उपस्थित होते. गावकऱ्यांची संख्या बघून साहेबांनी गावकऱ्यांना सांगितलं कि सगळ्यांचं काम आजच नाही होणार त्यामुळे हा कार्यक्रम २, ३ दिवस चालणार आहे. आणि आज फक्त थोड्या लोकांनी थांबावं आणि बाकीच्यांनी घरी जावं.
 
साहेब बोलले तसं सगळ्या गावकऱ्यांत कुजबुज सुरु झाली. दोन मिनिटांनंतर त्याच रुपांतर "तू जा ", " तू जा कि मंग"ह्याच्यावर आलं. काही लोक तर पार हमरी तुमरी वर आले होते. "परतेक येळी तुमचीच आळी पूड कामून" चेहि सूर ऐकू येऊ लागले. पण कोणीच जायला तयार नव्हतं.
काही लोक गप गुमान बसून मनोरंजन करून घेत होते, त्यात एक साहेब सोडून आधार वाली मंडळी पण होती.
 
शेवटी साहेबांनीच एक तोडगा काढला जो सर्वांना मान्य झाला. त्यांनी प्रत्येक आळीच्या नावाने एक अश्या पाच चिठ्या टाकल्या आणि त्यातली एक निवडली. मग साहेबांनी सांगितल्या प्रमाणे त्या आळीचे लोक सोडून बाकी सगळे आपापल्या घराच्या वाटेला लागले.
 
हा सगळा गोंधळ होई पर्यंत आधार वाल्यांनी आपल्या किटा वगैरे तयार करून ठेवल्याच होत्या.
आता प्रश्न पडला कि सगळ्यात अगोदर कोणाचं कार्ड काढायचं?
पण साहेबांनी ह्याच्यावर जास्त वाद विवाद नं होऊ देता सरळ सरपंचाच्या बायकोच कार्ड काढून श्री गणेशा केला.
सरपंचाच्या कुटुंबा नंतर गुरुजींचा नंबर लागला अन 'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न' म्हणतात तसं अजून एक विघ्न उभं राहिलं. गुरुजींनि आधार कार्डाचे ५० रुपये द्यायला स्पष्ट नकार दिला.
गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे "आधार कार्ड हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि तो हक्क सरकार ने फुकट देऊ केलेला आहे."
आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं कि आम्ही कार्डा चे पैसे नाही घेत तर पावतीला जे ल्यामिनेशन करतोय त्याचे पैसे आहेत, पण गुरुजी काही ऐकून घ्यायला तयारच नव्हते. त्यांनी पार वरच्या पट्टीत सूर लावला होता. म्हणजे लाच लुचपत खात्याला कळवीन वगैरे बोलू लागले तेव्हा आपल्या साहेबांना एन्ट्री घ्यावीच लागली.
साहेबांनी गुरुजीना एक कोपऱ्यात नेलं आणि दोघांची काय गुफ्तगू झाली कुणास दखल गुरुजी एकदम सुतासारखे सरळ झाले.

आधार वाल्या मंडळीच रमत गमत काम चालूच होतं तरीही त्यांनी एक एक असं करत आतापर्यंत पाच पन्नास लोकांचे कार्ड हातावेगळे केले होते. सभाग्रहामध्ये बायका आपल्या लेकरा बाळानां घेऊन बसल्या होत्या, पुरुष मंडळी मध्ये बिडी, तंबाकू ची देवाणघेवाण होत होती.काही उत्सुक मंडळी त्यात विशेष म्हणजे म्हाताऱ्या बायका  ज्यांना आधार वाल्यांच्या जेवणा ची वगैरे काळजी होती त्या ती चौकशी पण करत होत्या. असं एकंदरीत सगळं सुरळीत चालू असतानाच गुरुजीचं काम झाल्यामुळे ते आपल्या घराकडे निघाले. पण जाताना ते गावकऱ्यांचं मनोरंजन करून गेले.
बाहेर जाताना त्यांनी सभागृहाचे दार जोरात सोडले त्यामुळे ते चौकटीवर आदळले. तो आवाज ऐकून  सभागृहातच एका कोपऱ्यात झोपलेले आणि आपल्या आधार कार्ड काढायला आलेल्या पोरीचं रक्षण करायला म्हणून मागं थांबलेले गुरव आप्पा खडबडून जागे झाले अन काय झालं आहे हे न बघताच बाहेर पळत सुटले. त्यांना उठून पळतांना पाहून एक दोन गावकरी जे अर्धवट झोपेतच होते ते पण उठून पळण्याच्या तयारीतच होते. पण सभागृहामधला हशा ऐकून ते जागच्या जागीच थबकले.
पुढची पाच एक मिनिटं सगळे गावकरी पोट धरून हसत होती. साहेबांसोबतचा एक कार्यकर्ता तर पोट पकडून हसता हसता अक्षरशः लोळत होता.
फक्त एकच व्यक्ती शांत होती ती म्हणजे गुरव आप्पांची मुलगी. बिचारी शरमेनं अर्धमेली झाली होती आणि हसणाऱ्या गावकऱ्यांवर व दार आपटलेल्या गुरुजींवर चिडली होती.
थोड्या वेळाने परत सगळं पूर्ववत सुरु तर झालं खरं पण मधेच कोणी तरी खु:  खु: खु: करून हसायचं आणि परत सगळे त्यात सामील व्हायचे.
असं सगळ चालू असतानाच बेवड्या लोहाराचा नंबर आला. आधारवाल्या कार्यकर्त्याने त्याच्या कडे इलेक्शन कार्ड मागितलं. पण त्याच्याकडे ना इलेक्शन कार्ड होतं ना जन्माचा दाखला. कोणतं ओळखपत्र हि नव्हतं. तेंव्हा त्या कार्यकर्त्याने स्पष्ट सांगितलं कि तुमचं आधार कार्ड काढू शकत नाही.
पण हा गडी हट्टच धरून बसला होता कि मला आधार कार्ड पाहिजेच. आता तो बेवडा त्याच्या 'तोंडा'ला कोण लागणार?कार्यकर्त्यांनी त्याला समजावून सांगितलं कि बाबा ह्यापैक्की काहीही एक घेऊन ये आपण तुझं आधार कार्ड काढू. पण नाही गडी म्हणायचा-
"माझ्या पशी कायबी नायी मनूनच मला आधार कार्ड काडायचंय."
शेवटी साहेबांनी वैतागून त्याला सांगितलं "तुझ्याकडे हे कागदपत्र नाहीत ना, मग तू पाचशे रुपये जरी दिलेस तरी तुझं आधार कार्ड निघणार नाही." आणि सभागृहाच्या बाहेर हाकलून लावला.
गड्यांन तेच पकडलं अन गावातनं बोंब मारत फिरायला लागला कि आधार कार्ड काढायला ५०० रुपये मागत्यात. घरी जाऊन आपल्या बायकोला पण हेच सांगितलं.
आता त्याची बायको म्हणजे बंडू दादाची कार्यकर्ती तिने लागलीच बंडू दादांना फोन लावला. 

इकडे बंडू दादांचं आगमन झालंच होतं. पक्या आणि बाकी मंडळीला घेऊन ते गावातच 'बसले' होते.  
मागच्या पंचायत समितीच्या निवडणूकीला पक्क्या आणि गावातल्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं होतं. त्यामुळे बंडूदादा सगळ्यांवरच जाम खुश होते आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊनच 'बसणार' अशी भिष्म प्रतिज्ञा त्यांनी केली होती. त्यामुळे नाईलाजास्तव सगळेच कार्यकर्ते स्वर्गाच्या वाटेवर लागले होते. आणि त्यामुळेच पक्या आणि कंपनीच पृथ्वीवर 'आधार' देणाऱ्या लोकांकडे थोडसं दुर्लक्षच झालं होतं.
 
"ख..रं..रं  सांगू का बंडू दा..दा, आज आपण सर..गात हे, सर..गात , एक तर तुमच्या सारक्या भारी माणसा संग बसलुय आणि दारू बी भारीच..." एक मोठा घोट घेऊन पक्या पुढे बोलला "..हाये. फकस्त एकाच गोष्टीची कमी हाय बगा".
"ती रं आणि कोणती?" बंडू दादा पण चांगलेच फार्मात होते, त्यांनी इतक्या घाईत विचारलं कि जसं काही ते ती कमी लगेच पूर्ण करतील.
"अप्सरायची" पक्या बोलला आणि स्वतःच मोठ्याने हसायला लागला. बंडू दादा सुद्धा त्याच्या हसण्यात सामील झाले आणि एक दोन मिनिटांनी म्हणाले
" अप्सरा इथे कश्या येतील, सांग बरं , कश्या येतील?"
"का नायी यणार?" पक्या एक एक शब्द सुटा करत करत बोलला.
"आरं गावातल्या सगळ्या अप्सरा आधार कार्ड काढायल्यात नं" बंडू दादा एवढं बोलतायत नं बोलतायत तोच त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली.
मोबाईल वंरच नाव बघून ते पक्याला उद्देशून बोलले "अप्सरेचा फोन आला बघ" आणि फोन उचलला.
"साहेब , म्या टूमगावहून संगी ब्वल्तेय" बेवड्या लोहाराची बायको भीत भीतच बोलत होती.
"ह्म्म्म बोला बोला " बंडू दादा उठून थोडेसे बाजूला गेले त्यांना वाटत होतं काही विशेष "काम" असलं तर.
"हामच्या गावात बगा ते आदार कारड काडाया लोकं आलेती. अन ते पाचशे रुपय मागयलेत बगा, आता तुमीच सांगा आमी गरिबानं कसं करावं.?"
"ह्यांच्या मायला ह्यंच्या ५० घ्या म्हणलो तर हे पाचशे घ्यायलेत" बंडू दादा एकदम बोलून गेले, तसं तिने विचारलं.
"काय म्हनलात?"
"काई नाही काई नाही, मी गावातच हाये बघतो मी काय करायचं ते." दारूच्या नशेत हे काय बोलून गेलो म्हणून कप्पाळावर हात मारून घेत, गडबडीत बंडू दादा बोलले.

बंडू दादा चांगलेच संतापले होते. त्यांनीच ह्या पट्टीतल्या सगळ्या गावाचं आधार कार्ड काढायचं कंत्राट घेतलं होतं. शासनाकडून तर त्यांना हवा तसा मोबदला मिळतच होता. पण त्यांनी जनतेलाही लुटायची संधी सोडली नव्हती. दर आधार कार्डा मागे पन्नास रुपये घ्यायचे असा त्यांचा कार्यकर्त्यांना आदेश होता. ते विचार करू लागले कि माझे कार्यकर्ते माझ्या पेक्ष्या हि शहाणे निघाले ते त्यात पण फालकं मारायला बघतायत. आणि ते पण थोडं थोडक नव्हे तर चांगलं चारशे, साडे चारशे रुपये.
बंडू दादांना हा विश्वासघात सहन झाला नाही. ते तसच तडक सुदाम भाऊ आणि बाकी कार्यकर्त्यांना घेऊन चावडी कडे निघाले. चावडी तशी काय जास्त लांब नव्हतीच. पण रस्ता दगड धोंड्याचा होता. त्यात अमळ 'जास्तच' झाली होती. त्यामुळे ठेचकाळून एक दोनदा पडता पडताहि वाचले.
चावडी जवळ आल्या आल्या त्यांनी मोठ्याने गर्जना केली.
'कोण हाये रं ते आधार कार्ड काडाया पैशे मागायलय?"
बंडू दादांचा आवाज ऐकून आधार कार्ड काढणाऱ्या कार्यकर्त्या मध्ये दहशतच बसली. आणि ते एकमेकाकडे बघायला लागले. त्यांना वाटत होतं ह्यांनीच आम्हाला सांगितलं होतं कि पैसे घ्या म्हणून आणि आता हेच आमच्या वर गरम झालेत. त्यामुळे काहीतरी भानगड झालेली दिसतेय.
पण साहेब म्हणजे खमक्या माणूस होता. तो हि तेवढ्याच जोरात बोलला.
" मी घेतोय पैसे." काय म्हणणं आहे आपलं?
"आमचं एवडच म्हणणं हाये कि पैशे नाई घ्यायचे, गावकऱ्याकडून." दादा झुलत झुलत बोलत होते.
"मग तुम्ही द्या पैसे" साहेब.
"मी कामून देऊ पैशे, माझा काय संबंध?" दादा कधी ह्या पायावर तर कधी त्या पायावर असं करत उभं राहण्याचा प्रयत्न करत होते. पण खरं म्हणजे मागून एका गावकऱ्याने धरल्यामुळे ते उभे होते.
"तुमचा गावकंऱ्याशी काही संबंध नाही?" साहेबांनी गुगलीच टाकला.
"नायी म्हणजे माझा संबंध हायेच कि गावकऱ्यांशी" दादा एवढं बोलतात नं बोलतात तोच सुदाम भाऊ आवाज चढवून बोलले.
"ते कायी का आसना, पर आमी पैशे नायी देणार कार्ड काढाया."
"मग एक देखील कार्ड निघणार नाही इथून पुढे." साहेब काही हार मानायला तयार नव्हता.
सुदाम भाऊ आणि साहेबाची आता चांगलीच जुपली होती. पण इकडे बंडू दादाला समजत नव्हतं कि काय करावं ते. त्यांचाच माणूस त्यांचच ऐकत नव्हता. आणि ह्या सगळ्या गावकऱ्यासमोर त्याला झापता पण येत नव्हतं. म्हणून ते गप्प बसले. पण सुदाम भाऊ चांगलेच पेटले होते. त्यांना हि गावकऱ्यासमोर हिरो बनण्याची चांगली संधी वाटत होती. आणि सरपंच होण्याची त्यांची इच्छाहि ह्यातून पूर्ण होऊ शकते हे ते ओळखून होते.

"मग आमाला तुमचा बंदोबस करावा लागल." सुदाम भाऊंनी आपलं शेवटचं अस्त्र काढलं तसं साहेब सोडून बाकी तिघांची टरकली. त्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. त्यांना माहित होतं गावातले लोक एकदा मारायला लागले कि काही बघत नाहीत.
"बंदोबस्त करायलाच मी पोलिसांना बोलावलंय." साहेबांनी अजून एक गुगली टाकला.
आता मात्र सर्द का काय म्हणतात ते व्हायची पाळी सुदाम भाऊंची होती. त्यांना कळत नव्हतं हा माणूस आपणच खोटं वागतोय आणि आपणच पोलिसांना बोलावतोय असं का? म्हणजे नक्कीच कोण तरी मोठा माणूस असणार नाही तर ह्याच्यावर कोणीतरी मोठं असणार. त्यामुळे त्यांनी साहेबांच्या अंगाला हात लावायचं तर दूरच गपचूप एका बाजूला जाऊन बसले. 
सगळ्यांच्याच मनाला उत्सुकता लागली कि हे चाललय तरी काय? हे तर "उलटा चोर कोतवाल को डाटे" अशी गात झाली.
पण इकडे बंडू दादा आणि ते आधार कार्ड वाले तिघे यांची पाचावर धारण बसली होती. त्यांना माहित होतं कि जर पोलीस आले आणि हे जर उघडकीस आलं तर आपलं काही खरं नाही.
साहेब तसं बोलल्या नंतर एकप्रकारची विचित्र शांतता सभाग्रहात पसरली. आणि त्या शांततेचा भंग त्या तिघांपैकी एक जन करणार तेवढ्यात पोलिसांची गाडी चावडी जवळ येऊन उभी राहिली.

आता मात्र त्यांचे चेहरे कधीहि रडू कोसळेल असे झाले होते. आणि गावकऱ्यामध्ये आता काही तरी भारीच बघायला मिळणार अश्या स्वरूपातला उत्साह दिसत होता.
दोन हवालदार घेऊन इन्स्पेक्टर शिंदे आले होते. त्यांनी आल्या आल्या साहेबांसोबत दोन मिनिट काही तरी गुफ्तगू केली आणि ते बंडू दादा कडे वळले.
" चला, काठीकवडे साहेब" शिंदे हातावर रूळ आपटत बोलले.
' कुट ?" बंडू दादांची भंबेरी उडाली होती.
" पोलीस स्टेशन मध्ये" शिंदे.
शिंदे एवढं बोलतात तोच सुदाम भाऊ उसनं अवसान काढून बोलले.
" ओ साहेब तुमी 'चोर सोडून संन्याशाला फाशी" कामून देताय."
" म्हणजे?" शिंदेला तिथे काय झालं ते माहीतच नव्हतं.
" अवो ते आधार वाले साहेब पैशे मागायलेत आधार कार्ड काढायला आणि बंडू दादा अन आमी मनतोय कि आमी देणार नायी मनून, अन तुमी आमालाच आत टाकायले, खर्याची दुनिया नायी राईली साहेब." सुदाम भाऊ काकुळतिच्या सुरात म्हणाले.
शिंदेंनी एकवेळ आधार च्या साहेबाकडे हसून पाहिलं आणि दोन्ही भुवया वर उडवल्या तसं साहेबांनी मानेने होकार भरला.
इन्स्पेक्टर शिंदेंनी सगळ्या गावकऱ्यांना खाली बसवून सुरुवात केली.
"मंडळी , मी 'चोर सोडून संन्याशाला फाशी' द्यायला नाही आलोय तर खऱ्या चोराला पकडायला आलो आहे. आणि खरे चोर म्हणजे हे काठीकवडे साहेब आणि हे तिघे" आधार कार्ड काढायला आलेल्या कार्यकर्त्यांकडे बोट दाखवून शिंदे बोलले.
एवढं ऐकल्यावर गावकऱ्यामध्ये कुजबुज सुरु झाली. त्यांना शांत करून शिंदे पुढे बोलू लागले.
"तुम्हाला माहित आहे ह्या काठीकवडे साहेबांकडे आपल्या तालुक्यात जितके गाव आहेत तितक्या गावकऱ्यांचे आधार कार्ड काढायचे कंत्राट आहे. आणि त्यांच्याच सांगण्यावरून हे तिघे प्रत्येकी पन्नास रुपये घेतात.
आणि हे साहेब म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या जिल्ह्याचे नवीन कलेक्टर तुंगे साहेब आहेत."  आधार वाल्या साहेबाकडे बोट दाखवून शिंदे बोलले.
आता मात्र चित्र एकदम पालटलं होतं जो तो  कलेक्टर साहेबांकडे बघत होता. आणि आश्चर्याचे सूर उमटत होते. पण बंडू दादा आणि तिघांना मात्र एका पेक्ष्या एक मोठे धक्के बसत होते.
शिंदेनी ओळख करून दिल्यावर कलेक्टर साहेबांनी सूत्र आपल्या हातात घेतले.
" मंडळी, आम्हाला ह्या भ्रष्टाचाराची कुणकुण लागली होती म्हणूनच हा सापळा रचावा लागला. जेव्हा आम्हाला कळलं कि काठीकवडे साहेब ह्या दिवशी तुमच्या गावात येणार आहेत तेंव्हा आम्ही तुमचं गाव निवडलं आणि तोच दिवस ठरवला. म्हणजे सगळ्यांचा सोबतच पर्दाफाश करता येईल."
"पर साहेब तुमी यांच्या सोबत आलात आणि ह्यांना कळल कस नायी कि तुम्ही त्यांचे साहेब नाहीत मनून?" एका हुशार गावकऱ्याने त्या आधार वाल्या तिघांकडे बोट दाखवत प्रश्न विचारला.  
हसून साहेबांनी पुढे बोलायला सुरुवात केली.
"त्याचं काय झालं ह्यांचा जो साहेब होता त्याला आम्ही अगोदरच ताब्यात घेतला होता. आणि त्याच्याकडून ह्या तिघांना फोन करून सांगितलं कि आज बंडू दादांनी नवीन साहेबाबरोबर जायला सांगितलं आहे. आणि तो साहेब म्हणजे मी होतो, आणि मला अजून ह्या जिल्ह्यात कोण ओळखत नव्हतं. त्यामुळे ते खपून गेलं."

कलेक्टर साहेब एवढं बोलताच टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळे गावकरी उत्साहाने , आनंदाने टाळ्या वाजवत होते. त्यात सुदाम भाऊ, पक्या सुद्धा होते. टाळ्या ओसरतात नं ओसरतात तोच घोषणा सुरु झाल्या.

"काठीकवडे मुर्दाबाद"... "कलेक्टर साहेब जिंदाबाद"
"काठीकवडे मुर्दाबाद"... "कलेक्टर साहेब जिंदाबाद".

बंडू दादांनी आजपर्यंत गावकऱ्यांच प्रेम बघितलं होतं. पण चिडलेली आणि दुखावलेली जनता काय करू शकते याचा प्रत्रेय त्यांना आज येत होता.  

 

Saturday 13 July 2013

बबन्या

बस पाटीवर आली तसं  गाडीतून उतरलो आणि पाय वाटेने चालू लागलो, पाटी पासून गाव तसं जास्त लांब नाही, रमत गमत गेलं तर पावून एक तास लागेल एवढं अंतर , म्हणजे असेल तीन चार किलोमीटर. अजूनही गावात एस. टी. जात नाही आणि मलाही हि पायवाट फार आवडायची त्यामुळे एस टी गावात जायला पाहिजे असंही कधी वाटल नाही.त्याचं कारण हि तसंच होतं , दिवाळीत येताना मस्त हिरवी शेतं बघत, बोरं खात, नदी जवळून जायला भेटायचं आणि उन्हाळयामध्ये झाडावरच्या कैऱ्या खात. आमच्या गावाला खेटूनच मन्याड नदी जाते आणि  नदीच्या पलीकडे तिला सोबत करणारा डोंगर आहे.
नेहमीप्रमणे गोड्या आंब्यापाशी आलो आणि नजर वर गेली, ह्यावर्षी झाडावर आंबे मावत नव्हते, एका दगडात कैरी पाडली आणि घेऊन पुढे निघालो तसं एकदम आठवलं , मागच्या वर्षी ह्याच झाडावर एकही आंबा नव्हता.  अस काही नाही कि झाड मागच्या वर्षी लहान होतं आणि याच वर्षी त्याला पहिल्यांदा आंबे लागलेत. हे झाड म्हणजे नंबरीच आहे ह्याला दर दोन वर्षांनी आंबे लागतात, पण ज्या वर्षी लागतात त्या वर्षी इतके लागतात कि विचारता सोय नाही. म्हणजे खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी अश्यातली गत आहे.
आणि हे झाड खूप जुनं आहे गमतीची गोष्ट म्हणजे त्याच्या पोकळ ढोलीमध्ये एक दुसरं झाड आलेलं आहे आणि ते  देखील खूप वाढलं आहे. गावातली पोरं त्याला कांगारू आंबाच म्हणतात.
कैरी खाऊन झाली तसा नदी जवळच्या वाटेवर आलो होतो , टाचा वर करून बघितल नदीला पाणी आहे का ते, नेहमीसारखचं, विसरलो होतो उन्हाळा आहे ते आताशा हिवाळ्यात पाणी राहत नाही तर उन्हाळ्यात काय राहणार म्हणा.
 नेहमीच त्या पायवाटेने जाताना बऱ्याच गोष्टी बदललेल्या दिसतात आणि त्या गोष्टी बघत बघत गाव कधी येतो कळत नाही. तसा तो प्रत्येकालाच येतो खूप वर्ष्यानी आपल्या गावी गेल्यास. ह्या हि वेळी वेळ कसा गेला कळलंच नाही, नेहमीप्रमणे.
गावच्या शाळेजवळ आलो. शाळेत पोरं काही दिसली नाहीत. थोडं पुढं गेल्यावर कळलं कि ति तिथे का नव्हती ते. चावडीजवळ अखं गाव आल्यासारखं वाटत होतं, कळायला मार्ग नव्हता काय झालंय ते, झप झप पावले टाकत चावडी गाठली तसं पाटलाचा बाळ्या दिसला. त्यानंच विचारलं
"कवा आले विशालराव?"
"हे काय आत्ताच येतोय" हसत हसत बोललो.
गावातल्या लोकांना सवयच असते, एखादा माणूस नौकरीला 'लागला' कि त्याच्या नावाच्या मागं ह्यांनी राव 'लावलाच'.
" काय रे बाळ्या काय झालं एवढी गर्दी कशी काय आज?" माझं कुतुहूल अजूनही शमलं नव्हतं.
" अवो, ते बघा कि वर माकड बसलंय" बाळ्या हसत हसतच बोलला.
"माकड नाही, म्हाळ्या हाय म्हाळ्या" किश्या बाळ्याच्या हातावर टाळी देत बोलला.
"माकड, अन एका माकडासाठी अखं गाव चावडीपाशी होय रे ?" असं बोलतच वर त्या दिशेला बघितलं तर काय माकड हि नव्हत अन म्हाळ्या हि नव्हता. मल्लखांबाच्या टोकावर गंगुबाईचा 'बबन्या' काही तरी खात बसला होता.
त्याला बघून जरा हसूच आलं, आणि एका गोष्टीच आश्चर्यहि वाटलं कि मला आतापर्यंत कसा काय नाही दिसला तो. लगेचच किश्यानं माझी ती पण शंका दूर केली.
" अवो,  मल्लखांबाच्या बाजूच्या चिंचेच्या झाडावरनं वरी चढलय आणि कवा झाडावर तर कवा खांबावर अस कराया लागलंय."
" अन ते पुलिस बी शानंच हायेत, तीच फांदी तोडल्यात आणि बसलेत आता खांबां खाली, माकड खाली याची वाट बघत." बाळ्याने असं बोलल्यावर सगळेच हसायला लागले.
" अरे पण झालय तरी काय , अन पोलिस कश्याला आलेत?" मी न समजून विचारलं, बरोब्बर आत्ताच मला ते दिसले होते.
" आता घ्या, म्हनजी तुम्हाला काई माहीतच नायी कि" किश्या
"या असं बाजूला बसू लांबून तमाशा बघत, समदं सांगतोकि तुमाला" किश्याचं अजून संपलं नव्हतं.
किश्यान सगळी हकीकत सांगायला सुरुवात केली. मला वाटल होतं कि काय झालय ते पटकन सांगून गडी बाजूला होईल कारण मी अजून घरी पण गेलो नव्हतो, अन घरी कुणाला माहितहि नव्हतं मी आलेलो.
पण नाही, गडी रंगात येत गोष्ट सांगितल्या सारख सांगत होता.

"आपला बबन्या काल सकाळच्याला उटला, गड्यान सगळे कार्यकरम आवरले, अन निघाला राजूरला (तालुक्याचं गाव ). आता तुम्हाला तर महितेच हाय कि आपल्या गावात एस टी येत नाई ते , तर नेमिप्रमान गडी गुरुजीच्या आटो मदे बसून राजूरला गेला. इकडं तिकड फिरला असल दुपारपरेंत, दुपारच्या पारी गडी बसस्ट्याडं वर गेला."
"हा बरोबर हे , काल दिसला होता बसस्ट्याडं जवळ , म्या विचारलं पण तेला काय बबन्या काय म्हणतूस? तर जरा घुश्यातच वाटला गडी, काय पण बोलायला नाय." बाबुराव च्या हनम्यान किश्या ची टकळी बंद करत आपली चालू केली.
"दमा दमा , म्या सांगतूय नव्ह, समद्यांना बोलायचा मोअका मिळल." मिश्किल किश्याच्या ह्या बोलण्यावर सगळे हसले, पण हनम्या जरासा हिरमुसला.
" हा तर काय केलाय, गेलाय बसस्ट्याडं ला, किनवटच्या गाडीच्या कंडडाक्टर ला विचारलाय सावरगाव ला जाती का मनून, ते नेमकच आल होतं किनवट वरून अन बबन्याचा अवतार बगून तेला वाटल असल कोण येडं आलय मनुन, ते खेकसल ह्यच्यावर.
"तुज्या बानं ठेवली व्ह्य रे गाडी सावरगावला?"
हे बेनं चिडल कि तस मनल्यामुळ, जरा इकडं तिकडं बघितलाय , कंडडाक्टर ड्राईव्हरला लांब जाऊ देलाय, अन ते जशे लांब गेले तसा हा गडी शिरला ड्राईव्हर च्या कॅबीनमंदी, तवापर्यंत लोकं पण येउन बसल्याली व्हतीच, गाडी चालू केलाय अन निघाला कि गडी  बसस्ट्याडं मदुन गाडी घेऊन, अन विषेश म्हणजी त्याला कोनी पन हटकल नाय.गाडीतल्या लोकायला पन काय वाटल नाय कि बाबा कंडडाक्टर नाय हाय , अस कस काय मनुन.
जरा येळानं एका माणसांन इचारलं मन तेला
" ओ ड्राईव्हर साहेब, कंडडाक्टर साहेब राहिले कि स्ट्याडं वरच."
तर हा गडी म्हणतूय कसा
"राऊद्या आज पैशे माज्याकडच द्या"
ह्या किश्याच्या वाक्यावर परत खसखस पिकली.
किश्या गोष्ट सांगितल्या सारख अस सांगत होता कि जसा काही तो त्या बस मधेच होता. अन नेमकी तीच शंका मगाशी हिरमुसलेल्या हनम्यान विचारली.
" किसनराव , तुमी इस्टोरी अशी सांगायले जस काय बबनराव गाडी चालवत व्हते अन तुमी माग टीकटं फाडत व्हते" हनम्याच्या ह्या सणसणीत चपराकीवर सगळे खदखदून हसले.
"अरे भौ आज सकाळच्यालाच  हे समंद मला खुद बबन्यानच सांगितलंय" किश्यानं खरंखरं उत्तर दिलं.
"माजी लिंखं तोडूनका रे, मंग इसरून जातंय सगळ" एवढं बोलून किश्या परत सुरु झाला.
"हान… मंग गाडी जशी वाकीच्या पुलावरून सरोळ न जाता वरलाकडला वळली मंग काही लोकायला जाग आली, अन बबन्या ला विचाराय लागले
"ओ ड्राईव्हरसाहेब गाडी किनवटलाच जाती नव्ह?"
"नाई नाई हि सावरगावला जाणारी हाय" बबन्या तोऱ्यात बोलला मनं.
"अव्हो पर बोरड तर किनवटचा लावलाय, अन गाडी सावरगाव ला नेताय, आमाला आदि सांगायच नाई का मंग." त्यांच्यामद्ल्या ऐका माणसान इचारल.
"पाटी बदलायची राहिली असल, पर गाडी सावरगावलाच जाणार आज" बबन्या घुश्यात बोलला मनं.
"ओ थांबा मंग , आमाला किनवटाला जायचय" एक बाई बोलली मनं.
"नाई, आता काय थांबत नाय गाडी" बबन्या अजून पन घुश्यातच होता मनं.
बबन्या अस बोललय तवा गाडीतले सगळे लोकं लागले कि बोंबलायला, अन तुमाला तर महितेच हाय कि आपल्या गावचा रोड लई भारी, हा गडी तेवड्या दगड धोंड्यातनं गाडी बुंगाट दामटलाय, त्या बसमंदी आपले चिलख्याचे (शेजारचं गाव) गुरुजीबी होते मनं, त्यायनी सांगिटलं लोकास्नी कि आरं हे सावरगावच येडं हाय.
तर बस मधल्य्या काई लोकायला वाटल असल कि बाबा आज काई धडगत नाई , तवा एका माणसान हानली कि उडी मागल्ल्या दारानं, पार हात मोडून घेतलय मनं ते, तेच्या मागुण अजून दोगं तिघं व्ह्तेच मनं उड्या हानायला तय्यार, पन त्यचि अवस्ता बगून गप गुमान बसले मनं गाडीतच.
बायका तर लई दंगा करू लागल्या मनं, अन तवापर्यंत लोकंबी लई चिलडे मनं, दोगं जन आले कि मंग कॅबिनमंदी मारायला बबन्याला,तवा पत्तुर गाडी आल्ती कि पार  आपल्या मन्याडच्या पुलावर , ह्यो पठ्या काय केलाय गाडी हुभा केलाय साईडला अन धूम पळून गेलाय."
मंग काल सांच्यापारपासून पुलिस आल्ते धुन्डायला बबन्याला, पर काल गडी गावात नवताच त्यो आज सकाळच्यापारीच आलाय गावात, त्यो अन मी पाटीपासून संगच आलो म्हणाना, तर सगळी इस्टोरी सांगितलाय मला वाटंनं, अन तुमी यायच्या जरा आदीपासून हे नाटक सुरु हाय बगा, विशालराव"

किश्याची गोष्ट सांगून संपली तस सगळेजण उठले. सगळ्याचं लक्ष्य तिकडेच होतं. बबन्यानं पोलिसांना हैराण करून सोडलं होतं. तो आता खालीयेण्यासाठी काजू, बदाम खायला मागत होता. माझ्या मनात विचार स्पर्शून गेला कि हे आता बबन्या नाही तर त्याची गरिबी बोलत होती. त्याला पण वाटलं असेल एवढीच संधी आहे, घ्या मज्जा करून, पोलिस आपण खाली येण्यासाठी काहीही करतील.
गावात तसे मल्लखांबपट्टु होते पण कोणीच पोलिसांना मदत करत नव्हते, त्यांना पण मज्जा येत होती ह्या सगळ्यातून, आणि असही वाटत असेल कि एवढं गावाचं मनोरंजन होतंय तर का उगाच मध्ये बिब्बा घाला नाहीका?
दोन्ही पोलिस ढेरपोटे होते , जर त्यांनी मान खाली केली तर स्वताचे पाय दिसत नसतील ते काय त्या खांबावर चढणार.
पोलिसांनी बबन्याची मागणी पूर्ण केली, एका फडक्यात काजू, मनुके बांधून ती एका काठीला बांधली आणि बबन्या पर्यंत पोचेल अशी व्यवस्था केली.
बबन्याचं खाणं होई पर्यंत, बारक्या पोरांनी "माकडा माकडा हूप , तुज्या शेंडी ला तूप" म्हणत नुसता दंगा घातला होता. ती आता त्याला दगडच मारायची बाकी राहिली होती. गावकरीच त्यांना रोकत होते.
खाउन झाल्यावर पण बबन्या काही खाली येण्याचे चिन्ह दिसत नव्हते, पोलिस मग तर भलतेच तापले, त्यातल्या एकानं पोरांना हुकुम सोडला.
"ये बारक्याहो हाना रे दगडं माकडाला, येच्या मायला सकाळ पासनं लई दमविलाय हेनं"
दगड मारा म्हटल्याबरोबर एका पोरानं दगड उचलला अन जे भिरकावला बबन्याच्या दिशेने, पण तो काही बबन्याला लागला नाही. बबन्याच्या वरून जाऊन मागच्या बाजूने थांबलेल्या दिगुतात्याच्या खांद्याला लागला. तात्या ओरडले तसे सगळेच जमलेले हसायला लागले.
आता बबन्याची पण तंतरली होती, तो ओरडला.
"अये , दगडं मारु नकानबे, तुमच्या आयला, येतो बे म्या खाली, थांबा कि"
बबन्या एवढं बोलेपर्यंत बराच उशीर झाला होता, लहान पोरांनी दगडांची फायरिंगच सुरु केली होती बबन्या दगडं वाचवत खाली उतरायचा प्रयत्न करत होता अन गावकरी दगड लागू नये म्हणून पळत होते.बबन्यावर दगडांचा वर्षाव सुरु व्हायला आणि इतका वेळ रानात गेलेली त्याची माय गंगुबाई यायला एकच गाठ पडली.ती जशी आली तशी सगळ्यांनाच शिव्या द्यायला सुरुवात केली.
"मुडदा बशिवला तुजा" अस म्हणून तिनं एक लाकूड घेतलं आणि बबन्याच्या दिशेने गेली.
दगड मारणाऱ्या पोरांना वाटलं कि आता बबन्याच काही खरं नाही, आता बबन्या लई मार खातोय. म्हणून सगळी दगड न मारता तिथेच थांबून राहिली, पण जसं तिने एक, एक करून दगड मारणाऱ्याला बडवायला सुरुवात केली तसं सगळ्यांना समजलं कि बबन्याचं नाही तर आता आपलंच काही खरं नाही आणि सगळी धूम पळत सुटली.
बबन्या खाली आला तेंव्हा त्याच्या डोक्यात दगड लागून खोक पडली होती. गंगुबाई कुठूनतरी हळद आनून त्याच्या जखमेवर लावते न लावते तोच, बुटक्या पोलीसान एक काठी बबन्याच्या पार्श्वभागात लगावली.
"आयो मायो मेलो यो" करत बबन्या पळू लागला अन त्याच्या मागे गंगुबाई "पोराला मारू नका वो" म्हणत पोलिसाला विनवू लागली. अन ते बघून पाटलाच्या बाळ्याला उकळ्या फुटत होत्या.
ह्याच पाटलाच्या बाळ्या सोबत बबन्याने त्याच्या बहिणीला नको त्या अवस्तेत बघितलं होतं, अन तेंव्हापासूनच त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता, असं गावातले पोरं म्हणायचे.
 

Tuesday 25 June 2013

Blind Date


"हेलो" मनोज वैतागल्या सुरात बोलला, कामामध्ये मग्न असल्यामुळे त्याने जरा त्रासून फोन उचलला होता .

"हेल्लो मनोज सरच बोलताय न ?" पलीकडून आवाज आला .
"हा , बोलतोय , कोण बोलतय ?" मुलीचा आवाज ऐकल्यामुळे थोडासा खुशीतच मनोजने विचारले.
"सर मी सिमरन बोलतेय, आई ची आई ची आई क्रेडीट कार्ड ऑफिसातून."
" काय …? तुम्हाला पनजी म्हणायचय का?" जवळपास तीन चार सेकंद शांतते नंतर मनोज ओरडला , तो तापला होता कारण रोज दोनतीन जनी/जन तरी फोन करायचे क्रेडीट कार्ड साठी आणि त्याला कार्ड नको होतं आणि हा संबंध दिवसातला पाचवा फोन होता त्यामुळे त्याने हिची फिरकी घायची अस मनोमन ठरवलं होत
"आणि काय हो तुम्हाला कोणी अधिकार दिला माझी पनजी काढायचा." मनोजने मॉनिटर बंद करत जरासं रागातच विचारलं.
"अहो काय सर , मी कुठे तुमची पनजी काढली, अहो मी आई. सी. आई. सी. आई. क्रेडीट कार्ड ऑफिसातून बोलतेय .
"तुम्ही अगोदर आई ची आई ची आई बोललात, मी स्पष्ट ऐकल होतं" मनोज
"नाही सर मी तेव्हा सामोसा खात होते ना त्यामुळे तुम्हाला तसं  वाटल असेल, सॉरी अहो पण मी खरच आई. सी. आई. सी. आई. बोलले " पलीकडून जरासा ओशाळलेला आवाज आला.
"ओह्ह…  आई सी " ह्या कोटीवर मनोजला पलीकडून थोडासा हसण्याचा आवाज आला .
"सर, मला तुमचा फोन नंबर रवि सरांनी दिला, तुम्हाला क्रेडीट कार्ड हव होत ना ?" पलीकडून  बहुतेक हे सावज सापडतय अशी आशा असणारा आवाज आला
(ह्याच्या आयला ह्या रव्याच्या, ह्याला किती वेळा सांगितलंय कि असा माझा नंबर देत जाऊ नकोस म्हणून तरी हा ऐकत नाही , साल्या तू भेट आज मला तुला सांगतो बेट्या ) मनातल्या मनात रविला शिव्यांची लाखोली वाहून झाल्यावर मनोज बोलला.
"सध्या मला नकोय ओ, क्रेडीट कार्ड".
"सर, घ्या ना, मी तुम्हाला किती स्कीम्स देतेय, सोबत कॅश बैक ऑफर पण आहे" पलीकडून आता थोडासा आजचा कोटा पूर्ण होतो का नाही हि चिंता असलेला आवाज होता
"नाई नकोय ओ"
"का नकोय, ओ…….  ?"आता जरा लाडिक सूर होता.
(आयला हि येते वाटत गिअर मध्ये,मनोजला आता उकळ्या फुटत होत्या, त्याने थोडासा विचार केला आणि तिला बोलला )
"बंर एक काम करा मला एक वीस मिनिटांनी फोन करा." मनोज
" ठीके सर, मी करते तुम्हाला फोन वीस मिनिटांनी " पलीकडून परत आता आशावादी सूर होता.  
(आईची जय, काय करायच काही कळत नाही साला ह्यांना किती वेळा सांगा पण साले फोन करणारच, थांब जरा आता तुला दाखवतो , असं काय करावं बर कि हि पोरगी परत फोन करणार नाही , कि आपला तो फोर्मुला वापरावा, साला करावं कि नाही, एक दिवस डोकं कामातून जाणारेय माझं, साला आमच्या कडून काही होणार नाही नुसते विचार दंगा करणार मनात पण बोलायची वेळ आली कि फुस्स होतं सगळं , साला असं का होत असेल आपल्यासोबत कि सगळ्यांसोबतच होतं, ते म्हणतात ना most priavte thing in your life is most universal  कि तसच काहीतरी आहे, साला त्या बाईमुळे कामावर पण लक्ष्य लागत नाहीये , वैताग आहे ) आतापर्यंतच्या आयुष्यात मनोजने कोणताही निर्णय विनागोंधळाचा घेतला नव्हता आणि आजही तेच होणार होतं बहुतेक,मनोजचं आता नक्कीच कामावरून लक्ष्य विचलित झालं होतं. तो त्या फोन बद्दलच विचार करत होता, खरं तर त्या मुलीचा आवाज गोड होता आणि हि गोष्ट मनोजच्या नजरेतून सुटली नव्हती, त्यामुळे त्याच्या मनाची चलबिचल होत होती. तो ह्या आलेल्या फोनकडे एक सुवर्णसंधी म्हणून हि पहात होता आणि त्याला क्रेडीट कार्डची कटकटहि नको होती, आता  सुवर्णसंधी कशी तर त्याने रविला फोन करून झापत  असताना रविने त्याला बरोबर पिन मारून त्याच्या रागाच्या फुग्यातली सगळी हवाच काढली होती.रविच्या म्हणण्यानुसार हि पोरगी कटेबल होती म्हणजे डेट वर वगैरे येण्यासारखी होती आणि मनोज रवि ला सारख म्हणायचा "साला रव्या जिंदगीत काही रामच नाही असं वाटतं बघ आता, साला हे प्रेम वगैरे सब झूट असतं असं वाटतंय".

मनोजच एका मुलीवर प्रेम होत आणि त्या मुलीचहि होत, पण मनोजच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता आणि मनोज काही त्यांच्या  इच्छेबाहेर लग्न करनार्यातला नव्हता त्यामुळे आणि ह्या गोष्टीला आता जवळ जवळ दोन वर्ष झाले होते आणि ह्या दोन वर्ष्यात पुलाखालून बरच पाणी गेलं होतं, त्या पाण्यात पोह्ल्यामुळे असेल म्हणजे मनोजच वाचन वगैरे वाढलं होतं आणि तो आता सत्तावीस वर्षांचा झाला होता आणि ह्या वयात आता असले धंदे जुने असतील तर मानवतात पण नवीन सुरु करायचं म्हणजे थोडेसे कष्ट घ्यावे लागतात, आणि तो सध्या त्या विचारात नव्हता ,त्याला ती झंझट परत नको होती , पण मन मानत नव्हतं आणि रविचंहि हेच मत होतं कि जसं काट्याने काटा काढतात तसा एका पोरीचा अंमल उतरवायला दुसरी पोरगीच लागते.

मनोजने ने जागेवर येउन मॉनिटर ऑन केला आणि तो कामाला सुरुवात करणार इतक्यात त्याचा फोन व्हायब्रेट  झाला.

"हेल्लो"
"हेल्लो मनोज सर" मी सिमरन बोलतेय.
" हा बोला"
" मग काय विचार केला सर तुम्ही, कधी पाठवू आमच्या एक्झीकीटीव्हला , डॉकुमेंट्स साठी?" सिमरन आता सामोसे , चहा वगैरे सगळ संपून बोलत होती बहुतेक, कारण आवाज जोरदार आला होता
" अंमम , तुम्हाला खर सांगू का मला नकोयहो क्रेडीट कार्ड" मनोज
"सर, मी तुम्हाला किती स्कीम्स देतेय, सोबत कॅश बैक ऑफर पण आहे आणि तरीही तुम्ही नाही म्हणताय , मस्त शॉपिंग करायची, गर्लफ्रेंड ला फिरायला घेऊन जायच" परत आता लाडिक आवाज होता.
आईची जय साला रव्या म्हणतो तशीच दिसते हि, मनात असा विचार करून मनोजहि सुरु झाला.
"कायये माहितीय का, मी शॉपिंग एवढी करत नाही , आणि मला गर्लफ्रेंड पण नाही, हा पण तुम्ही जर म्हणत असाल तर एका अटीवर मी कार्ड घेतो."
"कोणत्या ?"
" आपण भेटूया एकदा, मग मी तुम्हाला माझे डॉकुमेंट्स देतो" मनोज खुशीच्या सुरात बोलला , त्याला वाटलं  होत कि भेटायचं बोललं कि हि कसली ऐकतेय रागारागाने फोन पण ठेऊन देईल आणि कटकट जाईल.
पण बहुतेक मनोजचे ग्रह फिरले होते, तीने अजूनही फोन ठेवला नव्हता.
  " नाही सर, आमचा एक्झीकीटीव्ह येईलन त्याच्या कडे द्या ना डॉकुमेंट्स"?
" नाही, माझी तेवढीच अट आहे बस, आणि कायओ तुम्ही आम्हाला फोन करणार, आम्हाला पटवणार … म्हणजे आम्हाला सांगणार सगळे डीटेल वगैरे आणि तुमचा एक्झीकीटीव्ह का कोण तो डॉकुमेंट्स घ्यायला येणार हे काही बरोबर नाही, तुम्ही सांगितलं ना मग तुम्हीच भेटलं पाहिजे" आता मनोजला पूर्ण खात्री होती कि फोन आपटल्या जाईल, पण नाही.
"बंर ठीकाय , सांगा कुठे भेटायचं ?" पलीकडून थोडासा अडखळत आवाज आला , मनोज साठी हा बाऊन्सरच होता, तरीही मनोज सावरून म्हणाला
"तुम्ही सांगा, मी कुठेही येऊ शकतो, तुमच ऑफिस कुठाय ?"
" स्वारगेट जवळ आहे, तुमचं कुठंय ?" हा मनोज साठी प्रतिप्रश्न होता.
"माझं , स्वारगेटहून बरच लांबये , पण मी तिकडे येऊ शकतो." मनोज विचार करत होता हिला कुठे भेटायचं.
" मग तुम्ही या ना सारसबागेत, आज संध्याकाळी?" वकार युनुसच्या योर्कर इतका सफाईदारपणा तिच्या बोलण्यात होता, आणि मनोजचा त्या योर्क वरती थोडक्यात बचावलेला गांगुली झाला होता.
"आज…?" जवळ जवळ तो ओरडलाच
" हो संध्याकाळी साडेसात वाजता आमच ऑफिस सुटतं "? तिकडून परत गोड आवाज.
साला काही म्हणा ह्या क्रेडीट कार्ड वाल्यांनी पोरी बाकी भारीच ठेवल्यात, अस बोलल्यावर कोण माई का लाल कार्ड नको म्हणेन असा विचार करत मनोज बोलला.
"नाई , आज नाई जमणार, वाटलं तर उद्या वगैरे नाहीतर वीकेंड ला भेटू?, आज गुरुवार आहेनं  आपण वीकेंडलाच भेटू, ठीकाय ?"
"ठीके  सर " हा मासा अजून आपली किती परीक्ष्या घेणार आहे अस मनोजला पलीकडून बोलल्यासारख वाटलं, आयला साली मासा बोलली कि माणूस याचाच विचार करत त्याने फोन ठेवला.

++++++++

संध्याकाळचे पाच वाजले, नेहमीप्रमाणे मनोज आणि त्यांचा ग्रूप एकमेकांना खुणा करून जागेवरून उठले आणि निघाली सायंफेरी कॅन्टीन कडे, मनोजला वाटत होत कि रवि ला फोन करावा आणि संगाव काय काय झाल ते तेवढ्यात त्याचा फोन वाजला.

"हेलो" मनोज
"हेल्लो, मनोज सर "
"हम्म , बोला "
"सर मग काय ठरवलंत तुम्ही?" थोडसं रागात बोलल्यासारख मनोजला वाटलं.
(आयला, हिन हिच्या मैत्रिणीला वगैरे सांगितलेलं दिसतंय सगळं, अन तिने सांगितलं असेल कि कश्याला जातेयेस भेटायला , कोण कुठचा माहित नाही अन काय नाही ) विचार करतच मनोज बोलला.
"कश्याबद्दल ?"
"अहो सर क्रेडीट कार्ड बद्दल "
"आपलं ठरलंय न , भेटायच?" (आयला, हि आता नाही म्हणते कि काय ) मनोज जरा  चिंतेच्या सुरात बोलला.
पलीकडून लगेचच फोन ठेवल्याचा आवाज आला.
(आयला बरं झालं बला गेली एकदाची, पण साला आली असती काय भेटायला, करेल का ती फोन परत, आता कसली करतेय एवढ बोलल्यावर कोण करेल फोन तुम्हाला) असे विचार आता मनोजच्या मनात दंगा करत होते त्याला दुखंहि होतं आणि आनंद हि होता, अश्या समिश्र भावनात त्याचा बाकीचा शुक्रवार गेला.

दोन दिवस पुण्याच्या आभाळावर पावसाचे ढग होते आणि मनोजच्या मनात त्या बाई चा फोन येतो कि नाही ह्या चिंतेचे, पावसाने हि दोन दिवस एकाही पुणेकराला घराबाहेर पडू दिले नाही त्यामुळे आपला मनोज घरात राहून राहून उबला होता, नाही म्हणायला पार्टी वगैरेचा बेत असल्यामुळे थोडंस त्याला नक्कीच बंर वाटत होतं.
रात्री झोपताना त्याला उद्या ऑफिसात काय काम आहे ह्याचा विचार करण्याची सवय होती, आणि तो हा विचार करत असतानाच त्याचा फोन वाजला
फोन रवीचा होता
"हेलो "
"मन्या , मग कधी ठरलीय भेट "? रवि ने पहिल्या वाक्यापासुनच त्याची (फिरकी)घ्यायला सुरुवात केली
"कसली भेट बे , अगोदर हो बोलली आणि नंतर तिच्या मैत्रिणीने (पिन )मारली वाटतं तर साला फोनच कट केला" मनोजच्या आवाजावरून तरी तो खूप desperate आहे तिला भेटण्यासाठी हे समजत होतं
"अरे, करेल रे ती फोन तुला, टेन्शन नको घेउस" रवि मनोजची अवस्था बघून मनातल्या मनात हसत होता .
"नाहीतर एक काम कर माझ्याकडे तिचा मोबाईल नंबर आहे, तूच कर तिला फोन उद्या " रविने विचार केला कि ह्याला आता जास्त छळण्यात काही अर्थ नाही, आणि त्याने मनोज ला तिचा नंबर दिला.
"अरे उद्या माझं ऑफिस आहे" मनोज चिंतेच्या स्वरात बोलला.
"अबे sunday ला कसलं बे ऑफिस?"
"उद्या sunday ये ?" मनोजच्या बोलण्यात जरासं आश्चर्य होतं
"मग काय monday ये का ?…ओह्ह हो हो म्हणजे एवढ पुढं गेलंय हो प्रकरण, साहेबांना आता दिवस पण लक्ष्यात नाहीत" रवि थांबायला तयार नव्हता.
"तसं काही नाहीये बे रव्या, साला बोअर झालोय महितेय् का दोन दिवस सारखा पाऊस"
"don't worry my friend, मी येतोय उद्या सकाळी, आल्यावर तुला फोन करतो , चल bye" मनोजला धीर देऊन रवीने फोन ठेवला.

पण अजूनही मनोजचे ग्रह जोरावर होते आणि त्याला रविवारी सकाळी सकाळी फोन आला, फोन मनोज ने रात्री जो नंबर सेव केला होता त्या नंबर वरून होता.
" हेलो , हम्म बोल " इति मनोज
"हेल्लो, मनोज …" ह्याला आता सर म्हणावं का नाही ह्या प्रश्नात गुंतलेला आवाज होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर नाही असं होतं.
"हम्म बोल ना " आता मनोज पण एकेरी वर आला होता
"तुम्हाला कस माहित मी बोलतेय ते?" आवाजामध्ये थोडंसं आश्चर्य होतं
" धुंडनैसे खुदा भी मिलता है, एक नंबर क्या चीज है, अस कोणी तरी म्हटलंय" मनोज हसत हसत बोलला.
" अच्छा , तुम्ही मला सांगणार नाही म्हणजे, ठीकाय" ती बोलली
"तुझं, खरं नाव सिमरनच आहे का ? कारण मी ऐकलंय, नावं वगैरे बदलतात म्हणे तुम्ही लोक" मनोज ने विचारलं
"माझं खंर नाव नाहीये काही ते, माझा नाव दुसरच आहे." (आय हाय … काय आवाज आहे) मनोज आपले डोळे मिटून त्या आवाजाची राणी कशी असेल ह्याचा विचार करत होता.
" मग नाव काय तुझं ? " तंद्रीतून बाहेर येत मनोजने विचारलं
"ते मी आपण भेटल्यावर सांगेन " पोरगी बाकी पक्की बेरकी होती.
"अच्छा , म्हणजे मग तर भेटावच लागेल" मनोज जसं काही तिच्यावर उपकार करणार आहे भेटून अश्या आवाजात बोलला, पण तिने त्याच्या टोन कडे दुर्लक्ष्य केल होतं.
"आज संध्याकाळी काय करताय ?"
" काही नाही , पाऊस बघत थांबायचा विचार आहे बाल्कनीत, कारण दोन दिवस झाले तेच करतोय" मनोजच्या या वाक्यावर ती खळखळून हसली.
" का? बाहेर जायचं, फिरायला वगैरे, पावसात किती मज्जा येते"
"हो मान्य आहे , पण कायये कोण तरी पाहिजे सोबत मज्जा यायला, एक तर माझा रूम मेट घरी गेलाय आणि बाकी सगळे मित्र कंपनीला वेळ नव्हता काल, त्यामुळे माझा घरकोंबडा झालाय" मनोज
"अच्छा, म्हणजे मी योग्य वेळी फोन केला "
" अर्थातच आणि आताही मी बाल्कनीतच उभा आहे पाऊस बघत."
"काळजी करू नका, आज भेटूया का आपण?" तिने जरा इकडे तिकडे नजर फिरवत विचारलं , जस काही ती मनोजला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नजरेने शोधत होती
"चालेल ना , कधी ?" (आता न भेटून सांगतोय कुणाला)  मनोज शेवटच वाक्य तिला ऐकू जाणार नाही अस पुटपुटत बोलला.
"चार वाजता, सारसबाग ?" तिच्या आवाजात उत्सुकता होती
"चार वाजता ठीकाय , पण सारसबाग नको, आपण सी. सी. डी. ला भेटूया" मनोज
"कुठलं सी. सी. डी. सारसबागे जवळच का?"
" काय ग तुला सारसबागे शिवाय काही माहीतच नाही का पुण्यातलं, सारख आपलं सारसबाग सारसबाग करतेस" मनोज थोडासा थटेच्या सुरात बोलला.
" मग कुठलं सांगा , आणि मी सारसबागेच्या जवळ राहते म्हणून बोललें, मला जवळ पडता ना ते, आणि माझ्या कडे गाडी पण नाही ना जास्त लांब यायला."
"ओके , हरकत नाय , टिळक रोडचं माहितेय का तुला ?" मनोजने विचारलं
"अं …. ते पोलिस चौकी जवळ आहे तेच ना ?"
"हो तेच, bye the  way तू किती वेळा गेलीयेस तिकडे?"
" गेले असेल दोन तीन वेळेस"
"पण …… चौकीत काय काम होतं तुला?" थोड्याश्या शांततेनंतर मनोज थट्टेच्या सुरात बोलला.
"ओय . चौकीत नाही काही …. मला वाटलं तुम्ही त्या सी. सी. डी. बद्दल बोलताय" जरासं रागावून तीपण बोलली
"हे हे हे …मस्करी केली जरा" मनोज ओशाळवानं हसत बोलला.
"ठीकाय, मग भेटूया चार वाजता? " ती
"okies, bye see you." मनोज
"bye bye" पलीकडून फोन ठेवल्याचा आवाज आला तसा मनोजने घड्याळाकडे बघितलं, अकरा वाजले होते. पण अजून रव्याचा फोन आला नव्हता.
मनोजला सुचत नव्हतं काय करावं ते, तो शहारून गेला होता पण त्याच्या मनात बरेच वाईट विचार हि येत होते. साला कोण कुठली माहित नाही जावं कि नाही भेटायला, नेहमीप्रमाणे तो निर्णय घेऊ शकत नव्हता, शेवटी त्याने रव्या ला फोन करून त्याच्या रूम वर बोलावून घेतला.

++++
रविला त्याने तीन वाजता ये म्हणून सांगितलं होतं तर रवि बरोबर इंडिअन वेळेप्रमाणे साडेतीनला पोचला.
रवि आल्याआल्या ते दोघेहि निघाले.
"मन्या, साल्या माझं काय काम आहे तिथे?" रवि बाईकला चावी लावत बोलला. एक तर तो आज फार थकला होता आणि मनोजने त्याच्या मागे टूमनं लावलं होत कि माझ्यासोबत चल म्हणून पण त्याची जायची अजिबात इछ्या नव्हती तरीही मित्राप्रेमा खातर त्याला जावच लागत होतं.
"साल्या चल न दाखवतो तुला पण ती कशी आहे ते." मनोज
" मी काय करू बघून तिला, शेवटी ती कशीही असली तर साहेबांचीच मज्जा आहे , आम्हाला काय मिळणार धतुरा" रवि अजून चिडलेलाच होता
"चल साल्या तुला पार्टी देतो नंतर" मनोज
"हा असं काही तरी पाहिजे मग माणसाला हुरूप येतो बाईक चालवायला" रवि आत्ता खुशीत आला होता.
"हा ठीकाय साल्या बघतो तुला नंतर, तुझा पण दिवस येईल, पण तुला सांगितलेलं सगळं लक्ष्यात आहे ना काय करायचं ते" मनोज
" हा रे बाबा किती वेळा तेच तेच विचारशील, मी तुझ्या सोबत आत जायचं नाही, वेगवेगळ्या जागेवर बसायचं आणि आपली ओळख नाही असं दाखवायचं." मनोजने पढवून ठेवलेली पट्टी रवि ने त्यालाच ऐकवली.

++++++
"मन्या, चल बेस्ट ऑफ लक, मी येतो नंतर , तू जा आता , बघ ती आली का." रवि पार्किंग मध्ये बाईक लावत बोलला
"साल्या रव्या माझी जास्त नाही पण थोडी नक्कीच फाटतेय रे" मनोज टेन्शन मध्ये आला होता.
"काही होत नाही साल्या, ती काय खाणार् ये का तुला ?" रवि त्याला धिर देत बोलला.
" साल्या तुला चिक्कार अनुभव आहेत रे , आम्ही नवीन आहोत या प्रांतात" मनोज
"साल्या मी काय रोज नवीन पोरी बरोबर फिरतो अस म्हणायचंय का तुला?, म्हणे चिक्कार अनुभव आहेत" रवि
"बर चल जाऊ दे जातो मी, चार वाजलेत , आणि मला लेट नाही व्हायचं , ते म्हणतात ना first impression is last impression." रविच्या डोक्यात टपली मारून मनोजने  सी. सी. डी. मध्ये प्रवेश केला.

 अजून पुरती संध्याकाळ झाली नव्हती म्हणून अजून तरी गर्दी फार अशी नव्हती, मनोज विचार करत होता साला पोरगी हुशार आहे गर्दी नको म्हणून चारचा टाइम दिला, आणि त्याने एक कोपऱ्यातली जागा पकडली.
जागेवर बसून त्याने एक चौफेर नजर टाकली आणि ती आली आहे का हे बघून घेतलं.

अजून ती आली नव्हती, आता मनोजच लक्ष्य दाराकडेच होतं  कारण ती जरी आली तरी त्याच दाराने येणार होती. तेवढ्यात त्याला रवि येताना दिसला रवि त्याच्याकडेच बघत होता , मनोज ने त्याला smile दिली पण रवि ने त्याला ओळखही दाखवली नाही आणि बरोबर त्याच्या मागच्या जागेवर जाऊन बसला तसं त्याला मनोज मागे वळून त्याच्याकडेच बघतो आहे अस दिसलं.

रविला खूप हसू येत होत पण तो ते कंट्रोल करत होता, काय माहित ती इथे असेल हि म्हणून आणि आपण हसलो कि मन्या चिडायचा म्हणून.

पण इकडे मनोजला रवीचा राग आला होता कारण रवि त्याच्या कडे बघून साधा हसला हि नव्हता.

इतक्यात त्याला एक मुलगी दारातून येताना दिसली, मुलगी तशी छान होती,  गोरी गोरी , लांबसडक केस , रेखीव लांबट चेहरा.
(आईची जय हि इकडे काय करतेय , साला करायला गेलो गणपती आणि मारोती होणार वाटतं आता) मनात असे विचार असताना मनोजचा फोन वाजला.
त्याने नंबर बघितला आणि दाराकडे बघितलं , त्याच वेळेस त्या मुलीची नजर सुद्धा मनोजकडे गेली होती.
तात्काळ तिच्या लक्ष्यात आल्यामुळे तिने फोन कट केला आणि मनोज समोर येउन उभी राहिली.
"हेल्लो , मनोजच ना ?" तिच्या आवाजात घबराट होती
"अ …. हो" मनोज कसं तरी बोलला
"मी प्राची ………म्हणजे सिमरन" तिने आपली खरी ओळख करून दिली
"बस ना" मनोज सोफा कडे बोट दाखवत बोलला.
" काय घेणार? " ती बसत असतानाच मनोजने विचारलं, दोघेहि थोडेसे हसले त्यामुळे का होईना दोघांवरचा तान थोडासा सैल झाला,

" अं तुझं …………. गाव कोणतं ?" एक लाते आणि एक कोल्ड कॉफी ची ऑर्डर घेऊन वेटर गेला तसं मनोज ने तिला विचारलं.
"आमचं  गाव खरं तर कोकणात आहे, पण मी इकडेच वाढले आणि आई पण म्हणते आता आपलं तिकडे कोणी नाही त्यामुळे सध्यातरी पुणे हेच आमचं गाव" तिने एकाच वाक्यात सगळी स्टोरी सांगून टाकली आणि फोर्म्यालीटी म्हणा किंवा बसमध्ये बसलेले उतारू जश्या हक्काने आपल्या शेजाऱ्याला "तुम्ही कुठे जाणार?" हा प्रश्न विचारतात तेवढ्याच हक्काने आणि त्याने विचारलं मग आपणहि विचारलंच पाहिजे ह्या गरजे पोटी  तोच प्रश्न मनोजला विचारला
"मी पुण्याचाच आहे" मनोज चटकन बोलून गेला जसं काही त्याला तिच्यासोबत संभाषण वाढवायचं नव्हतं, आणि एव्हाना तिच्या हि ती गोष्ट लक्ष्यात आली होती कि ह्याला कसली तरी घाई आहे.
तेवढ्यात वेटर हि ऑर्डर घेऊन आला होता कारण वर सांगितल्याप्रमाणे जास्त गर्दी नव्हती.

कॉलेज कुठलं वगैरे च्या गप्पा मारत मारत दोघांनीही आपआपली कॉफी संपवली, तेवढ्यात वेटर बिल घेऊन आला, तशी ती बिल देण्यासाठी पर्स काढत होती पण मनोजने तिला बिल देऊ न देता आपण बिल दिलं.

"निघुयाका?" मनोजने बिलाचे पैसे टेबल वर ठेवत फार अधीरतेने विचारलं
" ते आपलं क्रेडीट कार्ड विषयी बोलणं राहीलच न? तुम्हीच तर बोलला होतात ना, i mean तू, भेटून बोलू म्हणून" आता ह्याला direct कसं विचारायचं ना documents आणले का म्हणून , म्हणून थोड्याश्या आडवाटेने ती बोलली.
"ते आपण फोन वर, बोलू या का actually मला एका ठिकाणी जायचं आहे आणि मी चक्क विसरून गेलो होतो ते,  मला आता आठवतंय" मनोज ने थाप मारली होती.
"चालेल" तीही ह्याचा काही तरी प्रोब्लेम आहे हे ओळखून हो म्हणाली आणि दोघेही निघाले.

" चलो then bye" मनोज सी सी डी च्या दारात आल्यावर बोलला.
"see you" ती हसत त्याला bye करत बोलली.

इकडे रवि साहेब त्या वेटर ला दोन मिनिट, दोन मिनिट सांगून वैतागले होते आणि तो वेटर हि बरोब्बर दोनच मिनिटांनी रवि समोर हजर होत होता.
नाही म्हटलं तरी रवि ने तिला निट निरखून पहिली होती, आणि ते दोघे जसे दारात गेले तसा रवि उठला आणि त्यांच्या मागोमाग चालू लागला, एव्हाना त्या वेटर ला हि कळून चुकलं होतं कि हे चुकलेलं कष्टमर आहे.

+++
रवि जेंव्हा पार्किंग मध्ये आला तेव्हा मनोज फोन वर बोलत होता, पलीकडून बहुतेक त्याचि आई असावी असा  संशय रविला आला.
"मन्या , मला एक सांग , तू परवा जी मुलगी तुला सांगून आली म्हणून फोटो दाखवलास ती थोडी थोडी हिच्यासारखीच दिसते का रे?" मनोजने फोन ठेवला तस रवि बोलला.
"अरे बाबा दिसते नाही ती हीच आहे" मनोज जाम टेन्शन मध्ये होता.
"काय ? " रवि आपलं हसू आवरत बोलला.
"साल्या रव्या हसू नको , अरे, आत्ताच आई ला बोललो , तिने सांगितलं कि आजच तिच्या घरी माझे फोटो पाठवलेत आईने."
मनोज अजूनही ह्या धक्यातून पुरता बाहेर यायला तयार नव्हता आणि इकडे रवि ला मध्ये मध्ये उकळ्या फुटतच होत्या.
मनोजला काहीवेळाने जाणीव झाली कि तिला हे सगळ कळायला अजून अवकाश आहे आणि काही फरक पण पडणार नव्हता ना , नाही का? जसा मी आलो तशी ती हि आलीच होती कि एका blind date ला.

"मन्या आज तो पार्टी बनता है यार?" रवि ने बाईक चालू केली आणि मागे बसणाऱ्या मनोज ला विचारलं.
"yes my friend , lets celebrate our blind date" आणि ह्या वाक्यावर दोघेहि जोरजोरात हसत सुटले.