Wednesday 8 May 2013

शिवाजीनगर ते हिंजवडी



“मन्या, कसा वाटला पिक्चर?” रवी थेटरच्या बाहेर येत बोलला.

“चांगला होता, पण काही म्हण आ रव्या तुझी पसंद बदलिलीये, नाही तर अगोदर कसले कसले पिक्चर बघायचास तू आणि ते पण थेटरला जाऊन, काय नाव होतं रे त्या रामुच्या पिक्चरच?” मनोजने बाईकला चावी लावत रवीला विचारलं.
“डरना मना है, एवढा काही वाईट नव्हता आं तो, एकाच पिक्चर मध्ये तुला सहा सहा स्टोरी कोण दाखवतंय बे”. रवी बोलला.
“म्हणून तर तो पिक्चर पडला ना त्याने एकच स्टोरी दाखवली असती ना तर चालला असता बघ तो” मनोज हसत हसत बोलला.
“ते जाऊ दे, आता कशी आहे साहेबांची तब्येत?” रवीने मनोजला विचारलं.
“मला काय धाड भरलीये.” मनोज
“सगळं कळत राव आम्हाला, मन्या पहाटेपासून चिडला होतास, त्या पहाटटाइम्स वर, म्हणजे पहाटटाइम्स पेपर वर”
“रव्या, साल्या तू पीजे मारायची एकही संधी सोडत नाहीस.” मनोज हसत बोलला.
खरंच मनोज सकाळ पासून चिडला होता, कारण काल एका कार्यक्रमामध्ये प्रकाश आमटे आणि एका बॉलीवूड हिरो ला बोलावलं होतं, त्याला प्रकाश आमटेना भेटायचं होतं आणि नाहीच जमल तर कमीत कमी त्यांचे विचार, भाषण तरी ऐकायला मिळालं असत असा त्याचा विचार होता.पण ऑफिसच्या कामामुळे मनोज ला त्या कार्यक्रमामध्ये नाही जाता आलं. आणि आज त्याने पेपर उघडून पहिल तर काय पूर्ण बातमी तो हिरो काय बोलला, त्याने काय खाल्लं ह्याची होती आणि शेवटची एकच ओळ “प्रकाश आमटे तिथे उपस्थित होते” अशी होती, त्यामुळे मनोज सकाळपासूनच फार चिडला होता.
मनोजला सामाजिक कामांची आवड होती, तो एका सामाजिक काम करणाऱ्या संघटनेचा कार्यकर्ता होता आणि त्याच्या ऑफिस मधले काही लोक मिळून एक एन.जी.ओ. सुरु करायच्या विचारात होते, की जिच्या द्वारे गरजू लहान मुलांसाठी काही काम करता येईल.
मनोजची फिलोसोफी काही जगावेगळी नव्हती पण प्रत्येक माणूस हा वेगळा असतो तसाच तो देखील काही अंशी वेगळा होताच, तो म्हणायचा, माणसं म्हणतात कि आपण समाजाच काही तरी देणं लागतो म्हणून समाजासाठी काही तरी केलं पाहिजे हे काही बरोबर नाही तुम्ही एखाद्याला मारून मुटकून समाज कार्य करायला नाही लावू शकत, ति उर्मी आतूनच आली पाहिजे आणि तशी उर्मी, द्यायची दानत असणाऱ्या मध्ये असते आणि मनोज हि तसाच होता.
रव्या ने हा विषय काढल्यावर मनोजने त्यावर परत बोलायला सुरुवात केली.
“अरे रव्या आता मी का तुला सांगायला पाहिजे त्या माणसाबद्दल, साला मी तरी अजून तसा माणूस बघितला नाही, एवढा निस्वार्थी, त्यागी, अन ह्या साल्यांना काहीच कस वाटत नाही रे, ह्यांना एवढहि कळत नाही का कि खरा हिरो कोण ते, पूर्ण बातमी त्या हिरोची आणि शेवटी एक ओळ फक्त कि “प्रकाश आमटे कार्यक्रमाला उपस्थित होते”, नाही रे नाही काहीतरी चुकतंय आपल, तुला नाही वाटत असं?” मनोज
“जाऊ दे रे मन्या सोड, तू खूप विचार करतोस”
“ह्याच्यामुळेच, तुमच्या अश्या वागण्यामुळेच हे लोक शेफारलेत, तुम्हाला काहीच वाटत नाही म्हणल्यावर काय ते रोज छापतात मसालेदार बातम्या त्या बॉलीवूडच्या हिरों, हिरोइनच्या, आणि ज्या लोकांची सगळ्या जगाला माहिती व्हायला पाहिजे त्यांच्या नशिबी फक्त एक ओळ येते” मनोजने एका अमृततुल्य समोर बाईक थांबवत आपली चिडचिड व्यक्त केली.
“तू नाही बघत पिक्चर, तुला नाही आवडत ति कोण ति माधुरी?” रवी विजयी मुद्रेने मनोज कडे पहात बोलला, आई.पी.एलच्या इंनिंगच्या शेवटच्या बॉल वर एकही रन न देणाऱ्या बोलर सारखा त्याचा चेहरा झाला होता.
“मला वाटलच तू हे बोलणार, हो बघतो ना पण कोणते बघतो काही मोजकेच आशयघन किंवा काही वेगळे विषयावरचेच बघतो.”
“मन्या जाऊदे बाबा तू उगाच आपला वीकेंड वाया नको घालऊस चल एक एक चिल्ड बीअर मारू आणि मग बघू जेवायचं काय ते, तेवढाच तू जरा थंड होशील.” रवि सिगारेट शिलगावून बाहेर धूर टाकत बोलला.
+++++
“मन्या, हि बातमी वाचलीस का, अफझल गुरुला फाशी दिली.” रवी मनोजला उठवत बोलला.
“रव्या, तुला किती वेळा सांगितलय कि तू पेपर वाचत असताना उगाच दुसऱ्याला एखादी विशेष बातमी सांगत जाऊ नकोस म्हणून, कारण ति विशेष बातमी फक्त तुझ्यासाठी विशेष असते नाही तर ति आम्ही वाचलेली असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला पण वाचता येतं आणि वीकेंड ला वेळहि मिळतो वाचायला, काय.” मनोज बेडवर लोळत लोळत बोलला.
“हौ भाऊ आजच्या पेपर मधली बातमी तुम्ही अजून उठले नसताना कशी वाचली?
“रव्या, तू कुटनं आलायस रं? सोलापूर वरून का?” मनोजचा हा नेहमीचा प्रश्न होता. एखाद्याने काही बावळट प्रश्न विचारला किंवा काही मुर्खासारख काम केलं कि तो हमखास असं म्हणायचा.
 “अबे आमच्या कंपनीत इंटरनेट नावाची एक गोष्ट आहे, ज्याद्वारे आम्ही पूर्ण जगातल्या बातम्या अगदी त्या घडल्याच्या काही मिनिटात बघू शकतो आणि ति बातमी मी कालच वाचली कळल ना, आणि एक तर माझं डोकं जड पडलंय कालच्या तुमच्या त्या कॉकटेलन आणि तू पुन्हा वर बोर नको मारुस, झोपू दे मला जरा निवांत.” मनोज
 “नाही म्हणल तुझं ह्याच्यावरही काही मत असेल, म्हणून विचारलं आपलं, मन्या, तुझा फोन वाजतोय” रवी मनोजच्या मोबाईलवर नाव बघत बोलला.
“वाजुदे, माझा आता फोन उचलायचा अजिबात मूड नाहीये.”
“अन, जरी मानसीचा असला तरी?” रवीच्या चेहऱ्यावर हसू होतं.
“काय?” एकदम बेडवरन उठून मनोजने मोबाईल घेतला आणि बाल्कनीत पळाला.
“हाय, गुड मॉर्निंग.” तो मानसीचाच फोन होता.
“गुड मॉर्निंग, बोल” मनोज जरासा हळू आवाजात बोलला.
“काही नाही म्हटल शेजाऱ्याला, गुड मॉर्निंग विश कराव म्हणून फोन केला.”
“शेजारी, मी नाही समजलो” रवी जरा गोंधळात पडला होता.
“अरे, आम्ही कालच तुमच्या एरिया मध्ये शिफ्ट झालोत, मी तुला सांगणारच होते पण ऑफिस मध्ये तुझ्या ग्रूप मधल्या सगळ्यांसमोर नको म्हणून आता फोनच केला.” मानसीचा आनंदहि लपत नव्हता.
“अरे वा, पण तू सांगितलं असतस ऑफिस मध्ये तरीपण चालल असत बरका.”
“बर ते जाऊ दे, आज दुपारी काय करतोयस?”
“विशेष काही नाही, बोल.”
“ए, भेटशील कारे मग, मला थोडीशी खरेदी करायची होती आणि माझी रूममेट पण बाहेर जाणार आहे” मानसीने थोडसं अडखळत विचारलं.
“हौ, चालेल ना, कुठे येऊ ते सांग मी येतो, आणि किती वाजता?” मनोज जरासा शहारला होता.
“चार वाजता वगैरे, आणि मला काहीच माहित नाही इथलं अजून तूच सांग मी कुठे येऊ ते?
“बर ठीकेय, मी तुला तुझ्या रूमजवळून पिक करतो, तू कुठे राहते बोललीस?” मनोज ने विचारलं.
“अरे ते गणपती मंदिर आहेन त्याच्या मागच्या गल्लीत डाव्या बाजूची शेवटची बिल्डिंग”. मानसी
“ओके, मी येतो चार वाजता, आलो कि फोन करतो.” रवी
“ओके, बाय, सी यु देन” मानसी.

“काय राजे, कस काय आता डोकं तुमचं, तू फोन घेणार नव्हतान मग माझ्याकडे द्यायचा, मी बोललो असतो तिच्याशी मनोज म्हणून” रवी जरा मस्करीच्या मूड मध्ये होता.

“जे आपल आहे ना, ते सांभाळा आधी, मग दुसर्याच्या ताटात बघा.” मनोज हसत बोलला.
+++++
“मन्या, साल्या किती लवकर आलास? चार तास झाले तुला जाऊन, मी आपली वाट पाहतोय साहेब आता येतील मग येतील, फोन केला तर कट करताय, काय पोरगी भेटली कि एका दिवसात मित्राला विसरला होय?” मनोज आल्या आल्या रवीने आपली टकळी चालू केली.
“अरे बाबा जरा श्वास तर घेऊ दे मला, आलो नाही कि झाला सुरु आणि ये फोन कट नाही केला स्वीच ऑफ झालाय मोबाईल, चार्जिंग संपलंय.” मनोज हेल्मेट काढत बोलला.
“हम्म, बरोबरये आता कशाचं हि भान नाही रहात माणसाला” रवी
“रव्या, साल्या नीट राहा तू, जा चल फ्रेशहो मग निघू.” मनोज

“कुठे?” रवी थोडासा खुश होत बोलला.  
“साल्या, एवढा खुश नको होऊस, तुला काय बीअर नाही पाजणार, जेवायला जाऊ चल”.
 ++++
 मनोज आज थोडासा उशिराच उठला होता, उठल्या उठल्या त्याने पेपर चाळला, रोजच्याप्रमाणे त्याने फक्त हेडलाईन्स वाचल्या आणि तो बाथरूम मध्ये शिरला. रवी अजूनही उठला नव्हता, सहसा रवी रोज मनोजच्या अगोदर उठायचा पण आज रवी अजून झोपला होता आणि मनोजला पण त्याच काही वाटल नाही. मनोजला आज फार विचित्र वाटत होतं पण त्याला काही कळत नव्हत कि काय होतंय.
मनोजने नेहमी प्रमाणे आवरून घेतल तरीही अजून रवी झोपलाच होता, मनोज ला कळेना ह्याला काय झालंय त्याने रवी ला दोन,तीन हाका मारल्या तरीही रवी उठला नाही मग मनोज ने त्याचा नाद सोडून दिला.
पुण्याच्या पोलूशन मध्ये खरच उपयोगी पडेल, असा रुमाल बांधून मनोज ने डोक्यावर हेल्मेट चढवल आणि तो बाईक चालू करून घराबाहेर पडला. नेहमीप्रमाणे खूप ट्राफिक होतं, पी.एम.टी. बसेस अक्षरशः भरून पळत होत्या तर काही माणसं दारात लटकत होती.
शिमला ऑफिस ला वळसा घालून त्याची गाडी आपोआप थांबली, त्याला कळेना कि गाडी कशी थांबली ते, खरं तर गाडी त्यानेच थांबवली होती. तेवढ्यात त्याच्या लक्ष्यात आलं कि दोन तीन नजरा त्यालाच न्याहाळत आहेत. त्याला कळेना कि आज काय चाललंय काय गाडी अचानक थांबते काय, सगळे आपल्याकडे बघतायत काय, आणि काही जन तर बोट दाखवत होती तर काही हसत होती, तर काहींच्या डोळ्यात एक प्रकारचा आदर होता, सहज त्याच बाईकच्या पुढ्यात लक्ष गेल आणि त्याने पाटी वाचली.
“शिवाजीनगर ते हिंजवडी Lift, only gents
तेवढ्यात एक हात त्याच्या खांद्यावर येऊन पडला.
दादा phase १ ला जायचं होतं नेणार का.
 “मन्या, ये मन्या, ऑफिस नाहीये का आज?” रवी ने मनोजला उठवत विचारलं.
मनोज ला काही कळेना इथ रवी कुठून आला ते, तसं रवी ने त्याला हलवून उठवत बोलला.
“मन्या नाटकं, करू नकोस आ आता तू १ मिनिटापूर्वी चांगल्या दोन वेळा हाका मारल्यास रव्या म्हणून, आणि आता झोपेच सोंग घेतोयस, का झोपेतच बरळत होतास?”
आता मनोज पुरता जागा झाला होता आणि त्याला कळून चुकलं होतं कि ते एक स्वप्न होतं, मनोज ला तसाच बेड वर बसलेल पाहून रवी ओरडला.
”मन्या, लेका उठ पहिल्या दिवशी उशीर करू नये बाळ, नाही तर परिणाम वाईट होतात, उठ रे बाबा ति मानसी तुझी ऑफिस ला जायला वाट बघत असेल, काल केवढा खुश होऊन म्हणत होतास कि तिचा तुझ्यात इंटरेस्ट दिसतोय म्हणून.”
“रव्या, आपलं प्रत्येक स्वप्न खरं झालं असत तर किती चांगल झाल असत नाही” स्वप्नातून जागा झालेला मनोज बोलला.
“अरे होतंय कि तुझ स्वप्नं खर, येतेय कि तुझ्याबरोबर ति आजपासून.” रवी
रवी ला काय माहित होतं मनोज कोणत्या स्वप्नाबद्दल बोलत होता.