Tuesday 26 November 2013

'आधारा' ची रात्र

"उद्याच्याला आपल्या गावात आंधाराची रात हाये हो... ओ ओ ओ..."
"तरी समद्यांनी उद्या सांच्याला ७ वाज्त्ता चावडीवर हजर राहंच हाये हो ...ओ ओ ओ..."
"येताना समद्यांनी विलेक्शन कारड आनाचं हाये हो.... ओ ओ ओ..."
म्हादूनं हलगी वाजवत दवंडी द्यायला सुरुवात केली तसं चावडी जवळ खेळणारी पोरं सगळी खेळ थांबवून एकमेकाकडे बघून हसायला लागली. त्याचं कारण हि तसच होतं, त्यांनी त्यांच्या उभ्या जन्मात दवंडी कधी ऐकली नव्हती. जवळ जवळ सगळ्याच पोरांना हि गोष्ट नवीन होती.
म्हादू जसा चावडीकडून पुढ निघाला तसं सगळे पोरं एखादी नं बघितलेली गाडी गावात आल्यावर कसं मागे जातात. तसं त्याच्या मागे जायला लागली. तर इकडे चावडी वर बसलेल्यांना चरायला नवीन कुरण मिळालं.
"हि आणि कोणची रात मनायची?" गुरव आप्पानि मांडी घालून अवघडलेले पाय लांब करत पहिलं पिल्लू सोडलं.
"कोंच कि गीऱ्हान हाय कि मनं, त्यची रात आसल" ढमालेच्या बाबुदानं आपलं ज्ञान पाजळलं.
" पर म्या मनतो गीऱ्हानाला विलेक्शन कारड कश्यापाई फाहीजे" गणूतात्यानं रास्त शंका उपस्थित केली तशी बसलेली सगळी मंडळी हसायला लागली.
"आरं ती ग्रहणाची रात् नाही रं, ते आधार कार्ड काडन्यासाठी लोकं येणारायात, त्यची दवंडी हाय" आपल्या डोक्यावरच्या टोपिनं कपाळावरचा घाम पुसून मोठे आप्पा बोलले.
मोठे आप्पा म्हणजे चार बुकं शिकलेला माणूस होता. वरिष्ठ मंडळींच्यात त्यांची वट होती. सगळे गावकरी त्याचं ऐकायचे त्यांनी सांगितलेली कोणतीही गोष्ट खोटी असूच शकत नाही असा सगळ्यांचा समज असायचा. तशी ती आजहि खरीच होती. गावामध्ये आधार कार्ड काढण्यासाठी लोकं येणार होते. आणि त्याचीच दवंडी देत म्हादू गावातनं फिरत होता.
" पण हे दवंडीच नवीनच बघतूय कि" मोठ्या आप्पानि शंका उपस्थित केली.
" सरपंचानच सांगितलंय दवंडी द्यायला, हलगी नीट करून घेतलेत. इतून फुड आता गावात हलगी वाजणार बगा, अन म्हाद्याला काई काम नसतंय म्हणून दिलंय आपलं कामाला लाऊन ."
तंबाकुची थुंकी तोंडात सावरत वरच्या आळीचे नाना बोलले अन बोलून झाल्यावर त्यांनी एक लांब पिंक टाकली. नानांची हि खासियतच होती तोंडात तंबाकू असतानाच फक्त ते बोलायचे. पिंक बाहेर टाकली कि गप गुमान बसायचे. त्यांच्या ह्या सवयीला ओळखून नानांनी पिंक टाकली तसं बाबुदा बोलले.
"आरं पर हे येडं आंधाराची रात , आंधाराची रात करत फिरतंया कि. मी मनतो लोकायला कसं कळणार कश्याची रात हाये ते.?"
" मंग आणि काय, लोकं तर म्हण्तील रोजचं आंधार असतुया कि रातच्याला, उद्याच्याला काय नवीन हाय मंग" मोठ्या आप्पांची शंका रास्त होती.
म्हादू गावातनं फिरत होता अन गल्ली गल्ली मध्ये पोरं सोरं , गडी माणसं, बायका त्याला भंडावून सोडत होत्या कि "बाबा रोजच तर अंधार असतोय कि रात्री. मग उद्या आनी काय विशेष".
पण लोकांच्या या प्रश्नावर म्हादूकडे उत्तर नव्हतं. तो आपला प्रत्येक गावात जसा "सांग काम्या हो नाम्या" माणूस असतो, तसाच होता. 
पण दुसऱ्या वेळेला मात्र म्हादूने दवंडी देण्याच्या अगोदर गावात नेमकं काय येणार आहे हे सरपंचाकडून नीट समजून घेतलं आणि चोख काम केलं. आता गावातल्या सर्व लोकांना कळालं होतं कि गावात आधार कार्ड येणार म्हणून.

गावात सकाळ संध्याकाळ दोन वेळा दवंडी देऊन झाली. आधार कार्ड येणार म्हणल्यावर त्याची चर्चा झाल्याशिवाय थोडीच राहतेय. प्रत्येक घरा घरात त्या रात्री एकच चर्चा होती ती म्हणजे आधार कार्ड.
 
" म्या नायी यणार बाई ते आदार का फिदार कारड काडायला." बायजाक्का अंगणात बसलेल्या आपल्या लेकाला उद्देशून म्हणाली.
" कामून ते."
"ती शिन्द्यायची संगी मनत व्हती ते काई बाई डोल्यात घालत्यात मनं अन हातालाबी काय्की लावत्यात, त्यनं कोनचा कि रोग व्हतया मनं."
"कायी रोग अन फिग व्हत नस्तया, ती संगी एक सांगणार अन तू ऐकणार".
"हामच्या बुढयायच्या अरद्या गवऱ्या मस्नात गेल्यावर काय काडलया या सरकारनं बी"  बायजाक्का लेकाला उद्देशून म्हणाली खरी पण लेक काही ऐकून घायच्या मनस्थितीत नव्हता. तेव्हा तिनं आपलं आपलंच बडबडनं चालू ठेवलं.
 
घरा घरात थोड्या बहुत फरकाने हीच अवस्था होती. कोणी उत्सुक होतं तर कोणी भीत होतं. ज्या काही थोड्या फार मंडळीना माहित होतं, त्यांना निदान आजच्या पुरती तरी गावात मागणी होती.  ती सगळ्यांना समजावून सांगत होती कि हे नेमकं काय आहे आणि ह्याचं काम कुठे पडतंय ते.
 
बघता बघता दिवस सरला अन दुसरा दिवस उजाडला. दिवस कासराभर वर आला तसं उपसरपंच सुदाम भाऊंनी कार्यकर्त्यांची मीटिंग बोलावली. मीटिंग मधल्या प्रत्येकाला वाटत होतं कि आधार कार्डा बद्दल काही असेल पण प्रकरण थोडं वेगळ होतं.
उपसरपंचान्नी त्यांच्या खास शैलीत म्हणजे प्रत्येक वाक्याच्या शेवटच्या शब्दावर जोर देत, लांब हेल काढत सुरुवात केली.
"मंडळी आज आपल्या गावामंदी, आपल्या पार्टीचे जिल्ल्याचे अध्यक्ष बंडू दादा काठीकवडे यणार हायेत. अनि त्यायला खुश ठेवाची वरूनच आडर हाये. त्यामुळं रातच्याला कोंबडी, बिम्बडीचा बेत हाये. तर आपल्या कार्यकर्त्यांयनी कुट उंडारायचं नायि, समदा कार्यकरम नीट झाला पाहिजेल, नायी तर पुडच्या येळेला तिकीट मिळणार नायी अशी आडर हाये." 
भाऊंचं भाषण संपलं तसं सगळया कार्यकर्त्यांचे डोळे बघण्यासारखे झाले होते. प्रत्येक जन हर्ष उल्हासाने न्हाऊन गेला होता.
त्यांना माहित होतं कि हे काठीकवडे  आणि त्यांची मंडळी म्हणजे फुल पेताड. दर वेळी प्रमाणे पिऊन नुसता दंगा घालणार.  म्हणजे जे काही कोंबडी वगैरे संपवायचं काम आहे ते त्यांच्यावरच येऊन पडेल. ह्या विचारांनी त्यांच्या पोटात गुदगुल्या होत होत्या.
"भाऊ ते समंद हामि करू वो, पर आज ते आधार कारड वाले पण यणार हायेत मनं त्यायचाबी जरा बंदोबस्त करायला पाहिजेल असं आन्ना मनत व्हते." आपल्या चेहऱ्यावरचा आनंद लपवत पक्यानं आपली शंका बोलून दाखवली तसे भाऊ उचकले.
" त्यायला काय घरं दारं न्हाईत व्ह्य रं, मोटा आलाय आदार वाल्यायचा कैवारी."
"पर आन्ना मनत व्हते कि ते आपल्याला सोय व्हावी मनून रातच्याला यणार हायेत, दिसभर गावात कोण नसतंय समदे आपआपल्या रानायमंदी असत्यात तवा त्यायनीच मनले मनं कि आमी रातच्याला यतो मनून, तवा आपल्यालाबी त्यायची सोय बगावी लागल." पक्क्याने आन्नांचा विचार मांडला.
"ह..वो बाबू त्यायच्यातलाच एक बग अन घे जावई करून" भाऊ आता भलतेच गरम झाले होते.
भाऊंचा राग बघून पक्या आणि मंडळी गप गुमान भाऊंचा निरोप घेऊन तिथून सटकले.
कामं खूप होती अन वेळ थोडा. मी कंट्री, तू फॉरेन आणि तो कोंबडी असं  विभाजन करून मंडळीनि आपापसात कामं वाटून घेतली, अन कामाला लागली.
खरं तर आधार वाल्यांसोबत भाऊंची काय दुष्मनी नव्हती. पण आन्ना म्हणाले म्हणून त्यांना उलट जायचंच , हा भाऊंचा शिरस्ता होता. भाऊंना मागे पाडून आन्ना सरपंच झाले होते हा राग त्यांच्या मनात अजून खदखदत होता, म्हणून आन्नांच्या गैरहजेरीत भाऊ सरपंच आन्नाच्या वर राग राग करत.
 
हा हा म्हणता म्हणता संध्याकाळ झाली. अन एकदाचे दोन मोटरसायकल वर चार जण आधार कार्डच्या किटा घेऊन गावात हजर झाले. त्यांच्या अवतारावरूनच वाटत होतं कि मंडळी खूप लांबच्या पल्ल्यावरून आली आहे. कपड्या, केसांवर नुसती धूळ साचली होती, प्रत्येकजण प्रवासाने शिणलेला दिसत होता.
गावात आल्या आल्या त्यांच्यातल्या एकाने गाडी थांबवून एका माणसाला सरपंचाच घर विचारलं.
त्या बहादरानं पण सरपंचाच घर नं सांगता त्यांची व्यवस्था चावडीमागच्या शामियान्यात केल्याच सांगितलं. तसं सगळे तिकडेच निघाले.
कार्यकर्त्यानी बंडू दादा येणार म्हणून सगळी जय्यत तयारी केली होती. एक छोटासा शामियाना बरोब्बर चावडीच्या मागच्या बाजूला उभारला होता. त्याला चारही बाजूंनी कोणाला दिसू नये म्हणून पडदे वगैरे लावले होते. सहसा तिकडे कोण गावकरी जात नसत आणि रात्री तर काळ कुत्र पण फिरकत नसे. अंगणवाडीची खोली चावडीला लागुनच पण चावडीच्या विरुद्ध दिशेला होती. तिच्यात सगळ्या गाद्यालोड वगैंरे ची जय्यत तयारी होती.  शामियाना आणि बाकीची व्यवस्था बघून आधार वाल्यांचा साहेबतर जाम खुश झाला. पण हि खुशी जास्त वेळ त्याच्या चेहऱ्यावर टिकली नाही.
कारण उपसरपंचाचं तेवढ्यात आगमन झालं होतं आणि आल्याआल्या त्यांनी विचारलं.
"काय मंडळी कस काय वाट चुकला आमच्या गावाकड?"
"आम्ही आधार कार्ड वाले आहोत, आपण कोण?" साहेबांनी सभ्य भाषेत विचारलं.
"हामि व्हय, म्या उपसरपंच हाय गावचासुदाम भाऊ म्हणत्यात मला"  उपसरपंच जरा गुर्मीतच बोलले.
" रात्री सगळे गावकरी इथेच जमणार असं दिसतंय." साहेब शामियान्याकडे हात दाखवत एवढं बोलणार कि लगेच सुदाम भाऊ त्याला आडवत बोलले.
"काय, यड का खुळ तुम्ही आं, ते जिल्ल्याचे पुढारी येणारेत त्यायच्यासाठी केलंय हे समदं."
"ओ तुम्ही जरा नीट बोला, कोणाला बोलताय माहित आहे का?"
वेडा म्हटल्यामुळे साहेब जरा दुखावल्याच गेले होते.
"ठीकाय ठीकाय, तुमची यवस्था तिकडं केली असल बघा चावडीकड" सुदाम भाऊ अजून तेठच होते.
भाऊ एवढं बोलणार तेवढ्यात पक्क्या तिथं येऊन हजर झाला. त्याने तिथ काय झालं हे साहेबांच्या तोंडावरून हेरलं अन पटकन आधार कार्ड वाल्या मंडळीची चावडी कडे नेऊन सगळी व्यवस्था लावली.
वणव्यासारखी गावात बातमी पसरली कि आधार कार्ड आलं आणि चावडीकडे गावकऱ्यांची इलेक्शन कार्ड, पोरांचे जन्माचे दाखले हे सगळं घेऊन झुंबड उडाली.
चावडीसमोरच्या सभागृहात सगळं गाव जमा झालं होतं. गावाची लोकसंख्या पाच सहाशे च्या घरात होती आणि सध्या नाही नाही म्हणलं तरी चारशे बाई, माणूस उपस्थित होते. गावकऱ्यांची संख्या बघून साहेबांनी गावकऱ्यांना सांगितलं कि सगळ्यांचं काम आजच नाही होणार त्यामुळे हा कार्यक्रम २, ३ दिवस चालणार आहे. आणि आज फक्त थोड्या लोकांनी थांबावं आणि बाकीच्यांनी घरी जावं.
 
साहेब बोलले तसं सगळ्या गावकऱ्यांत कुजबुज सुरु झाली. दोन मिनिटांनंतर त्याच रुपांतर "तू जा ", " तू जा कि मंग"ह्याच्यावर आलं. काही लोक तर पार हमरी तुमरी वर आले होते. "परतेक येळी तुमचीच आळी पूड कामून" चेहि सूर ऐकू येऊ लागले. पण कोणीच जायला तयार नव्हतं.
काही लोक गप गुमान बसून मनोरंजन करून घेत होते, त्यात एक साहेब सोडून आधार वाली मंडळी पण होती.
 
शेवटी साहेबांनीच एक तोडगा काढला जो सर्वांना मान्य झाला. त्यांनी प्रत्येक आळीच्या नावाने एक अश्या पाच चिठ्या टाकल्या आणि त्यातली एक निवडली. मग साहेबांनी सांगितल्या प्रमाणे त्या आळीचे लोक सोडून बाकी सगळे आपापल्या घराच्या वाटेला लागले.
 
हा सगळा गोंधळ होई पर्यंत आधार वाल्यांनी आपल्या किटा वगैरे तयार करून ठेवल्याच होत्या.
आता प्रश्न पडला कि सगळ्यात अगोदर कोणाचं कार्ड काढायचं?
पण साहेबांनी ह्याच्यावर जास्त वाद विवाद नं होऊ देता सरळ सरपंचाच्या बायकोच कार्ड काढून श्री गणेशा केला.
सरपंचाच्या कुटुंबा नंतर गुरुजींचा नंबर लागला अन 'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न' म्हणतात तसं अजून एक विघ्न उभं राहिलं. गुरुजींनि आधार कार्डाचे ५० रुपये द्यायला स्पष्ट नकार दिला.
गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे "आधार कार्ड हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि तो हक्क सरकार ने फुकट देऊ केलेला आहे."
आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं कि आम्ही कार्डा चे पैसे नाही घेत तर पावतीला जे ल्यामिनेशन करतोय त्याचे पैसे आहेत, पण गुरुजी काही ऐकून घ्यायला तयारच नव्हते. त्यांनी पार वरच्या पट्टीत सूर लावला होता. म्हणजे लाच लुचपत खात्याला कळवीन वगैरे बोलू लागले तेव्हा आपल्या साहेबांना एन्ट्री घ्यावीच लागली.
साहेबांनी गुरुजीना एक कोपऱ्यात नेलं आणि दोघांची काय गुफ्तगू झाली कुणास दखल गुरुजी एकदम सुतासारखे सरळ झाले.

आधार वाल्या मंडळीच रमत गमत काम चालूच होतं तरीही त्यांनी एक एक असं करत आतापर्यंत पाच पन्नास लोकांचे कार्ड हातावेगळे केले होते. सभाग्रहामध्ये बायका आपल्या लेकरा बाळानां घेऊन बसल्या होत्या, पुरुष मंडळी मध्ये बिडी, तंबाकू ची देवाणघेवाण होत होती.काही उत्सुक मंडळी त्यात विशेष म्हणजे म्हाताऱ्या बायका  ज्यांना आधार वाल्यांच्या जेवणा ची वगैरे काळजी होती त्या ती चौकशी पण करत होत्या. असं एकंदरीत सगळं सुरळीत चालू असतानाच गुरुजीचं काम झाल्यामुळे ते आपल्या घराकडे निघाले. पण जाताना ते गावकऱ्यांचं मनोरंजन करून गेले.
बाहेर जाताना त्यांनी सभागृहाचे दार जोरात सोडले त्यामुळे ते चौकटीवर आदळले. तो आवाज ऐकून  सभागृहातच एका कोपऱ्यात झोपलेले आणि आपल्या आधार कार्ड काढायला आलेल्या पोरीचं रक्षण करायला म्हणून मागं थांबलेले गुरव आप्पा खडबडून जागे झाले अन काय झालं आहे हे न बघताच बाहेर पळत सुटले. त्यांना उठून पळतांना पाहून एक दोन गावकरी जे अर्धवट झोपेतच होते ते पण उठून पळण्याच्या तयारीतच होते. पण सभागृहामधला हशा ऐकून ते जागच्या जागीच थबकले.
पुढची पाच एक मिनिटं सगळे गावकरी पोट धरून हसत होती. साहेबांसोबतचा एक कार्यकर्ता तर पोट पकडून हसता हसता अक्षरशः लोळत होता.
फक्त एकच व्यक्ती शांत होती ती म्हणजे गुरव आप्पांची मुलगी. बिचारी शरमेनं अर्धमेली झाली होती आणि हसणाऱ्या गावकऱ्यांवर व दार आपटलेल्या गुरुजींवर चिडली होती.
थोड्या वेळाने परत सगळं पूर्ववत सुरु तर झालं खरं पण मधेच कोणी तरी खु:  खु: खु: करून हसायचं आणि परत सगळे त्यात सामील व्हायचे.
असं सगळ चालू असतानाच बेवड्या लोहाराचा नंबर आला. आधारवाल्या कार्यकर्त्याने त्याच्या कडे इलेक्शन कार्ड मागितलं. पण त्याच्याकडे ना इलेक्शन कार्ड होतं ना जन्माचा दाखला. कोणतं ओळखपत्र हि नव्हतं. तेंव्हा त्या कार्यकर्त्याने स्पष्ट सांगितलं कि तुमचं आधार कार्ड काढू शकत नाही.
पण हा गडी हट्टच धरून बसला होता कि मला आधार कार्ड पाहिजेच. आता तो बेवडा त्याच्या 'तोंडा'ला कोण लागणार?कार्यकर्त्यांनी त्याला समजावून सांगितलं कि बाबा ह्यापैक्की काहीही एक घेऊन ये आपण तुझं आधार कार्ड काढू. पण नाही गडी म्हणायचा-
"माझ्या पशी कायबी नायी मनूनच मला आधार कार्ड काडायचंय."
शेवटी साहेबांनी वैतागून त्याला सांगितलं "तुझ्याकडे हे कागदपत्र नाहीत ना, मग तू पाचशे रुपये जरी दिलेस तरी तुझं आधार कार्ड निघणार नाही." आणि सभागृहाच्या बाहेर हाकलून लावला.
गड्यांन तेच पकडलं अन गावातनं बोंब मारत फिरायला लागला कि आधार कार्ड काढायला ५०० रुपये मागत्यात. घरी जाऊन आपल्या बायकोला पण हेच सांगितलं.
आता त्याची बायको म्हणजे बंडू दादाची कार्यकर्ती तिने लागलीच बंडू दादांना फोन लावला. 

इकडे बंडू दादांचं आगमन झालंच होतं. पक्या आणि बाकी मंडळीला घेऊन ते गावातच 'बसले' होते.  
मागच्या पंचायत समितीच्या निवडणूकीला पक्क्या आणि गावातल्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं होतं. त्यामुळे बंडूदादा सगळ्यांवरच जाम खुश होते आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊनच 'बसणार' अशी भिष्म प्रतिज्ञा त्यांनी केली होती. त्यामुळे नाईलाजास्तव सगळेच कार्यकर्ते स्वर्गाच्या वाटेवर लागले होते. आणि त्यामुळेच पक्या आणि कंपनीच पृथ्वीवर 'आधार' देणाऱ्या लोकांकडे थोडसं दुर्लक्षच झालं होतं.
 
"ख..रं..रं  सांगू का बंडू दा..दा, आज आपण सर..गात हे, सर..गात , एक तर तुमच्या सारक्या भारी माणसा संग बसलुय आणि दारू बी भारीच..." एक मोठा घोट घेऊन पक्या पुढे बोलला "..हाये. फकस्त एकाच गोष्टीची कमी हाय बगा".
"ती रं आणि कोणती?" बंडू दादा पण चांगलेच फार्मात होते, त्यांनी इतक्या घाईत विचारलं कि जसं काही ते ती कमी लगेच पूर्ण करतील.
"अप्सरायची" पक्या बोलला आणि स्वतःच मोठ्याने हसायला लागला. बंडू दादा सुद्धा त्याच्या हसण्यात सामील झाले आणि एक दोन मिनिटांनी म्हणाले
" अप्सरा इथे कश्या येतील, सांग बरं , कश्या येतील?"
"का नायी यणार?" पक्या एक एक शब्द सुटा करत करत बोलला.
"आरं गावातल्या सगळ्या अप्सरा आधार कार्ड काढायल्यात नं" बंडू दादा एवढं बोलतायत नं बोलतायत तोच त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली.
मोबाईल वंरच नाव बघून ते पक्याला उद्देशून बोलले "अप्सरेचा फोन आला बघ" आणि फोन उचलला.
"साहेब , म्या टूमगावहून संगी ब्वल्तेय" बेवड्या लोहाराची बायको भीत भीतच बोलत होती.
"ह्म्म्म बोला बोला " बंडू दादा उठून थोडेसे बाजूला गेले त्यांना वाटत होतं काही विशेष "काम" असलं तर.
"हामच्या गावात बगा ते आदार कारड काडाया लोकं आलेती. अन ते पाचशे रुपय मागयलेत बगा, आता तुमीच सांगा आमी गरिबानं कसं करावं.?"
"ह्यांच्या मायला ह्यंच्या ५० घ्या म्हणलो तर हे पाचशे घ्यायलेत" बंडू दादा एकदम बोलून गेले, तसं तिने विचारलं.
"काय म्हनलात?"
"काई नाही काई नाही, मी गावातच हाये बघतो मी काय करायचं ते." दारूच्या नशेत हे काय बोलून गेलो म्हणून कप्पाळावर हात मारून घेत, गडबडीत बंडू दादा बोलले.

बंडू दादा चांगलेच संतापले होते. त्यांनीच ह्या पट्टीतल्या सगळ्या गावाचं आधार कार्ड काढायचं कंत्राट घेतलं होतं. शासनाकडून तर त्यांना हवा तसा मोबदला मिळतच होता. पण त्यांनी जनतेलाही लुटायची संधी सोडली नव्हती. दर आधार कार्डा मागे पन्नास रुपये घ्यायचे असा त्यांचा कार्यकर्त्यांना आदेश होता. ते विचार करू लागले कि माझे कार्यकर्ते माझ्या पेक्ष्या हि शहाणे निघाले ते त्यात पण फालकं मारायला बघतायत. आणि ते पण थोडं थोडक नव्हे तर चांगलं चारशे, साडे चारशे रुपये.
बंडू दादांना हा विश्वासघात सहन झाला नाही. ते तसच तडक सुदाम भाऊ आणि बाकी कार्यकर्त्यांना घेऊन चावडी कडे निघाले. चावडी तशी काय जास्त लांब नव्हतीच. पण रस्ता दगड धोंड्याचा होता. त्यात अमळ 'जास्तच' झाली होती. त्यामुळे ठेचकाळून एक दोनदा पडता पडताहि वाचले.
चावडी जवळ आल्या आल्या त्यांनी मोठ्याने गर्जना केली.
'कोण हाये रं ते आधार कार्ड काडाया पैशे मागायलय?"
बंडू दादांचा आवाज ऐकून आधार कार्ड काढणाऱ्या कार्यकर्त्या मध्ये दहशतच बसली. आणि ते एकमेकाकडे बघायला लागले. त्यांना वाटत होतं ह्यांनीच आम्हाला सांगितलं होतं कि पैसे घ्या म्हणून आणि आता हेच आमच्या वर गरम झालेत. त्यामुळे काहीतरी भानगड झालेली दिसतेय.
पण साहेब म्हणजे खमक्या माणूस होता. तो हि तेवढ्याच जोरात बोलला.
" मी घेतोय पैसे." काय म्हणणं आहे आपलं?
"आमचं एवडच म्हणणं हाये कि पैशे नाई घ्यायचे, गावकऱ्याकडून." दादा झुलत झुलत बोलत होते.
"मग तुम्ही द्या पैसे" साहेब.
"मी कामून देऊ पैशे, माझा काय संबंध?" दादा कधी ह्या पायावर तर कधी त्या पायावर असं करत उभं राहण्याचा प्रयत्न करत होते. पण खरं म्हणजे मागून एका गावकऱ्याने धरल्यामुळे ते उभे होते.
"तुमचा गावकंऱ्याशी काही संबंध नाही?" साहेबांनी गुगलीच टाकला.
"नायी म्हणजे माझा संबंध हायेच कि गावकऱ्यांशी" दादा एवढं बोलतात नं बोलतात तोच सुदाम भाऊ आवाज चढवून बोलले.
"ते कायी का आसना, पर आमी पैशे नायी देणार कार्ड काढाया."
"मग एक देखील कार्ड निघणार नाही इथून पुढे." साहेब काही हार मानायला तयार नव्हता.
सुदाम भाऊ आणि साहेबाची आता चांगलीच जुपली होती. पण इकडे बंडू दादाला समजत नव्हतं कि काय करावं ते. त्यांचाच माणूस त्यांचच ऐकत नव्हता. आणि ह्या सगळ्या गावकऱ्यासमोर त्याला झापता पण येत नव्हतं. म्हणून ते गप्प बसले. पण सुदाम भाऊ चांगलेच पेटले होते. त्यांना हि गावकऱ्यासमोर हिरो बनण्याची चांगली संधी वाटत होती. आणि सरपंच होण्याची त्यांची इच्छाहि ह्यातून पूर्ण होऊ शकते हे ते ओळखून होते.

"मग आमाला तुमचा बंदोबस करावा लागल." सुदाम भाऊंनी आपलं शेवटचं अस्त्र काढलं तसं साहेब सोडून बाकी तिघांची टरकली. त्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. त्यांना माहित होतं गावातले लोक एकदा मारायला लागले कि काही बघत नाहीत.
"बंदोबस्त करायलाच मी पोलिसांना बोलावलंय." साहेबांनी अजून एक गुगली टाकला.
आता मात्र सर्द का काय म्हणतात ते व्हायची पाळी सुदाम भाऊंची होती. त्यांना कळत नव्हतं हा माणूस आपणच खोटं वागतोय आणि आपणच पोलिसांना बोलावतोय असं का? म्हणजे नक्कीच कोण तरी मोठा माणूस असणार नाही तर ह्याच्यावर कोणीतरी मोठं असणार. त्यामुळे त्यांनी साहेबांच्या अंगाला हात लावायचं तर दूरच गपचूप एका बाजूला जाऊन बसले. 
सगळ्यांच्याच मनाला उत्सुकता लागली कि हे चाललय तरी काय? हे तर "उलटा चोर कोतवाल को डाटे" अशी गात झाली.
पण इकडे बंडू दादा आणि ते आधार कार्ड वाले तिघे यांची पाचावर धारण बसली होती. त्यांना माहित होतं कि जर पोलीस आले आणि हे जर उघडकीस आलं तर आपलं काही खरं नाही.
साहेब तसं बोलल्या नंतर एकप्रकारची विचित्र शांतता सभाग्रहात पसरली. आणि त्या शांततेचा भंग त्या तिघांपैकी एक जन करणार तेवढ्यात पोलिसांची गाडी चावडी जवळ येऊन उभी राहिली.

आता मात्र त्यांचे चेहरे कधीहि रडू कोसळेल असे झाले होते. आणि गावकऱ्यामध्ये आता काही तरी भारीच बघायला मिळणार अश्या स्वरूपातला उत्साह दिसत होता.
दोन हवालदार घेऊन इन्स्पेक्टर शिंदे आले होते. त्यांनी आल्या आल्या साहेबांसोबत दोन मिनिट काही तरी गुफ्तगू केली आणि ते बंडू दादा कडे वळले.
" चला, काठीकवडे साहेब" शिंदे हातावर रूळ आपटत बोलले.
' कुट ?" बंडू दादांची भंबेरी उडाली होती.
" पोलीस स्टेशन मध्ये" शिंदे.
शिंदे एवढं बोलतात तोच सुदाम भाऊ उसनं अवसान काढून बोलले.
" ओ साहेब तुमी 'चोर सोडून संन्याशाला फाशी" कामून देताय."
" म्हणजे?" शिंदेला तिथे काय झालं ते माहीतच नव्हतं.
" अवो ते आधार वाले साहेब पैशे मागायलेत आधार कार्ड काढायला आणि बंडू दादा अन आमी मनतोय कि आमी देणार नायी मनून, अन तुमी आमालाच आत टाकायले, खर्याची दुनिया नायी राईली साहेब." सुदाम भाऊ काकुळतिच्या सुरात म्हणाले.
शिंदेंनी एकवेळ आधार च्या साहेबाकडे हसून पाहिलं आणि दोन्ही भुवया वर उडवल्या तसं साहेबांनी मानेने होकार भरला.
इन्स्पेक्टर शिंदेंनी सगळ्या गावकऱ्यांना खाली बसवून सुरुवात केली.
"मंडळी , मी 'चोर सोडून संन्याशाला फाशी' द्यायला नाही आलोय तर खऱ्या चोराला पकडायला आलो आहे. आणि खरे चोर म्हणजे हे काठीकवडे साहेब आणि हे तिघे" आधार कार्ड काढायला आलेल्या कार्यकर्त्यांकडे बोट दाखवून शिंदे बोलले.
एवढं ऐकल्यावर गावकऱ्यामध्ये कुजबुज सुरु झाली. त्यांना शांत करून शिंदे पुढे बोलू लागले.
"तुम्हाला माहित आहे ह्या काठीकवडे साहेबांकडे आपल्या तालुक्यात जितके गाव आहेत तितक्या गावकऱ्यांचे आधार कार्ड काढायचे कंत्राट आहे. आणि त्यांच्याच सांगण्यावरून हे तिघे प्रत्येकी पन्नास रुपये घेतात.
आणि हे साहेब म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या जिल्ह्याचे नवीन कलेक्टर तुंगे साहेब आहेत."  आधार वाल्या साहेबाकडे बोट दाखवून शिंदे बोलले.
आता मात्र चित्र एकदम पालटलं होतं जो तो  कलेक्टर साहेबांकडे बघत होता. आणि आश्चर्याचे सूर उमटत होते. पण बंडू दादा आणि तिघांना मात्र एका पेक्ष्या एक मोठे धक्के बसत होते.
शिंदेनी ओळख करून दिल्यावर कलेक्टर साहेबांनी सूत्र आपल्या हातात घेतले.
" मंडळी, आम्हाला ह्या भ्रष्टाचाराची कुणकुण लागली होती म्हणूनच हा सापळा रचावा लागला. जेव्हा आम्हाला कळलं कि काठीकवडे साहेब ह्या दिवशी तुमच्या गावात येणार आहेत तेंव्हा आम्ही तुमचं गाव निवडलं आणि तोच दिवस ठरवला. म्हणजे सगळ्यांचा सोबतच पर्दाफाश करता येईल."
"पर साहेब तुमी यांच्या सोबत आलात आणि ह्यांना कळल कस नायी कि तुम्ही त्यांचे साहेब नाहीत मनून?" एका हुशार गावकऱ्याने त्या आधार वाल्या तिघांकडे बोट दाखवत प्रश्न विचारला.  
हसून साहेबांनी पुढे बोलायला सुरुवात केली.
"त्याचं काय झालं ह्यांचा जो साहेब होता त्याला आम्ही अगोदरच ताब्यात घेतला होता. आणि त्याच्याकडून ह्या तिघांना फोन करून सांगितलं कि आज बंडू दादांनी नवीन साहेबाबरोबर जायला सांगितलं आहे. आणि तो साहेब म्हणजे मी होतो, आणि मला अजून ह्या जिल्ह्यात कोण ओळखत नव्हतं. त्यामुळे ते खपून गेलं."

कलेक्टर साहेब एवढं बोलताच टाळ्यांचा कडकडाट झाला. सगळे गावकरी उत्साहाने , आनंदाने टाळ्या वाजवत होते. त्यात सुदाम भाऊ, पक्या सुद्धा होते. टाळ्या ओसरतात नं ओसरतात तोच घोषणा सुरु झाल्या.

"काठीकवडे मुर्दाबाद"... "कलेक्टर साहेब जिंदाबाद"
"काठीकवडे मुर्दाबाद"... "कलेक्टर साहेब जिंदाबाद".

बंडू दादांनी आजपर्यंत गावकऱ्यांच प्रेम बघितलं होतं. पण चिडलेली आणि दुखावलेली जनता काय करू शकते याचा प्रत्रेय त्यांना आज येत होता.  

 

No comments:

Post a Comment