Saturday 13 July 2013

बबन्या

बस पाटीवर आली तसं  गाडीतून उतरलो आणि पाय वाटेने चालू लागलो, पाटी पासून गाव तसं जास्त लांब नाही, रमत गमत गेलं तर पावून एक तास लागेल एवढं अंतर , म्हणजे असेल तीन चार किलोमीटर. अजूनही गावात एस. टी. जात नाही आणि मलाही हि पायवाट फार आवडायची त्यामुळे एस टी गावात जायला पाहिजे असंही कधी वाटल नाही.त्याचं कारण हि तसंच होतं , दिवाळीत येताना मस्त हिरवी शेतं बघत, बोरं खात, नदी जवळून जायला भेटायचं आणि उन्हाळयामध्ये झाडावरच्या कैऱ्या खात. आमच्या गावाला खेटूनच मन्याड नदी जाते आणि  नदीच्या पलीकडे तिला सोबत करणारा डोंगर आहे.
नेहमीप्रमणे गोड्या आंब्यापाशी आलो आणि नजर वर गेली, ह्यावर्षी झाडावर आंबे मावत नव्हते, एका दगडात कैरी पाडली आणि घेऊन पुढे निघालो तसं एकदम आठवलं , मागच्या वर्षी ह्याच झाडावर एकही आंबा नव्हता.  अस काही नाही कि झाड मागच्या वर्षी लहान होतं आणि याच वर्षी त्याला पहिल्यांदा आंबे लागलेत. हे झाड म्हणजे नंबरीच आहे ह्याला दर दोन वर्षांनी आंबे लागतात, पण ज्या वर्षी लागतात त्या वर्षी इतके लागतात कि विचारता सोय नाही. म्हणजे खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी अश्यातली गत आहे.
आणि हे झाड खूप जुनं आहे गमतीची गोष्ट म्हणजे त्याच्या पोकळ ढोलीमध्ये एक दुसरं झाड आलेलं आहे आणि ते  देखील खूप वाढलं आहे. गावातली पोरं त्याला कांगारू आंबाच म्हणतात.
कैरी खाऊन झाली तसा नदी जवळच्या वाटेवर आलो होतो , टाचा वर करून बघितल नदीला पाणी आहे का ते, नेहमीसारखचं, विसरलो होतो उन्हाळा आहे ते आताशा हिवाळ्यात पाणी राहत नाही तर उन्हाळ्यात काय राहणार म्हणा.
 नेहमीच त्या पायवाटेने जाताना बऱ्याच गोष्टी बदललेल्या दिसतात आणि त्या गोष्टी बघत बघत गाव कधी येतो कळत नाही. तसा तो प्रत्येकालाच येतो खूप वर्ष्यानी आपल्या गावी गेल्यास. ह्या हि वेळी वेळ कसा गेला कळलंच नाही, नेहमीप्रमणे.
गावच्या शाळेजवळ आलो. शाळेत पोरं काही दिसली नाहीत. थोडं पुढं गेल्यावर कळलं कि ति तिथे का नव्हती ते. चावडीजवळ अखं गाव आल्यासारखं वाटत होतं, कळायला मार्ग नव्हता काय झालंय ते, झप झप पावले टाकत चावडी गाठली तसं पाटलाचा बाळ्या दिसला. त्यानंच विचारलं
"कवा आले विशालराव?"
"हे काय आत्ताच येतोय" हसत हसत बोललो.
गावातल्या लोकांना सवयच असते, एखादा माणूस नौकरीला 'लागला' कि त्याच्या नावाच्या मागं ह्यांनी राव 'लावलाच'.
" काय रे बाळ्या काय झालं एवढी गर्दी कशी काय आज?" माझं कुतुहूल अजूनही शमलं नव्हतं.
" अवो, ते बघा कि वर माकड बसलंय" बाळ्या हसत हसतच बोलला.
"माकड नाही, म्हाळ्या हाय म्हाळ्या" किश्या बाळ्याच्या हातावर टाळी देत बोलला.
"माकड, अन एका माकडासाठी अखं गाव चावडीपाशी होय रे ?" असं बोलतच वर त्या दिशेला बघितलं तर काय माकड हि नव्हत अन म्हाळ्या हि नव्हता. मल्लखांबाच्या टोकावर गंगुबाईचा 'बबन्या' काही तरी खात बसला होता.
त्याला बघून जरा हसूच आलं, आणि एका गोष्टीच आश्चर्यहि वाटलं कि मला आतापर्यंत कसा काय नाही दिसला तो. लगेचच किश्यानं माझी ती पण शंका दूर केली.
" अवो,  मल्लखांबाच्या बाजूच्या चिंचेच्या झाडावरनं वरी चढलय आणि कवा झाडावर तर कवा खांबावर अस कराया लागलंय."
" अन ते पुलिस बी शानंच हायेत, तीच फांदी तोडल्यात आणि बसलेत आता खांबां खाली, माकड खाली याची वाट बघत." बाळ्याने असं बोलल्यावर सगळेच हसायला लागले.
" अरे पण झालय तरी काय , अन पोलिस कश्याला आलेत?" मी न समजून विचारलं, बरोब्बर आत्ताच मला ते दिसले होते.
" आता घ्या, म्हनजी तुम्हाला काई माहीतच नायी कि" किश्या
"या असं बाजूला बसू लांबून तमाशा बघत, समदं सांगतोकि तुमाला" किश्याचं अजून संपलं नव्हतं.
किश्यान सगळी हकीकत सांगायला सुरुवात केली. मला वाटल होतं कि काय झालय ते पटकन सांगून गडी बाजूला होईल कारण मी अजून घरी पण गेलो नव्हतो, अन घरी कुणाला माहितहि नव्हतं मी आलेलो.
पण नाही, गडी रंगात येत गोष्ट सांगितल्या सारख सांगत होता.

"आपला बबन्या काल सकाळच्याला उटला, गड्यान सगळे कार्यकरम आवरले, अन निघाला राजूरला (तालुक्याचं गाव ). आता तुम्हाला तर महितेच हाय कि आपल्या गावात एस टी येत नाई ते , तर नेमिप्रमान गडी गुरुजीच्या आटो मदे बसून राजूरला गेला. इकडं तिकड फिरला असल दुपारपरेंत, दुपारच्या पारी गडी बसस्ट्याडं वर गेला."
"हा बरोबर हे , काल दिसला होता बसस्ट्याडं जवळ , म्या विचारलं पण तेला काय बबन्या काय म्हणतूस? तर जरा घुश्यातच वाटला गडी, काय पण बोलायला नाय." बाबुराव च्या हनम्यान किश्या ची टकळी बंद करत आपली चालू केली.
"दमा दमा , म्या सांगतूय नव्ह, समद्यांना बोलायचा मोअका मिळल." मिश्किल किश्याच्या ह्या बोलण्यावर सगळे हसले, पण हनम्या जरासा हिरमुसला.
" हा तर काय केलाय, गेलाय बसस्ट्याडं ला, किनवटच्या गाडीच्या कंडडाक्टर ला विचारलाय सावरगाव ला जाती का मनून, ते नेमकच आल होतं किनवट वरून अन बबन्याचा अवतार बगून तेला वाटल असल कोण येडं आलय मनुन, ते खेकसल ह्यच्यावर.
"तुज्या बानं ठेवली व्ह्य रे गाडी सावरगावला?"
हे बेनं चिडल कि तस मनल्यामुळ, जरा इकडं तिकडं बघितलाय , कंडडाक्टर ड्राईव्हरला लांब जाऊ देलाय, अन ते जशे लांब गेले तसा हा गडी शिरला ड्राईव्हर च्या कॅबीनमंदी, तवापर्यंत लोकं पण येउन बसल्याली व्हतीच, गाडी चालू केलाय अन निघाला कि गडी  बसस्ट्याडं मदुन गाडी घेऊन, अन विषेश म्हणजी त्याला कोनी पन हटकल नाय.गाडीतल्या लोकायला पन काय वाटल नाय कि बाबा कंडडाक्टर नाय हाय , अस कस काय मनुन.
जरा येळानं एका माणसांन इचारलं मन तेला
" ओ ड्राईव्हर साहेब, कंडडाक्टर साहेब राहिले कि स्ट्याडं वरच."
तर हा गडी म्हणतूय कसा
"राऊद्या आज पैशे माज्याकडच द्या"
ह्या किश्याच्या वाक्यावर परत खसखस पिकली.
किश्या गोष्ट सांगितल्या सारख अस सांगत होता कि जसा काही तो त्या बस मधेच होता. अन नेमकी तीच शंका मगाशी हिरमुसलेल्या हनम्यान विचारली.
" किसनराव , तुमी इस्टोरी अशी सांगायले जस काय बबनराव गाडी चालवत व्हते अन तुमी माग टीकटं फाडत व्हते" हनम्याच्या ह्या सणसणीत चपराकीवर सगळे खदखदून हसले.
"अरे भौ आज सकाळच्यालाच  हे समंद मला खुद बबन्यानच सांगितलंय" किश्यानं खरंखरं उत्तर दिलं.
"माजी लिंखं तोडूनका रे, मंग इसरून जातंय सगळ" एवढं बोलून किश्या परत सुरु झाला.
"हान… मंग गाडी जशी वाकीच्या पुलावरून सरोळ न जाता वरलाकडला वळली मंग काही लोकायला जाग आली, अन बबन्या ला विचाराय लागले
"ओ ड्राईव्हरसाहेब गाडी किनवटलाच जाती नव्ह?"
"नाई नाई हि सावरगावला जाणारी हाय" बबन्या तोऱ्यात बोलला मनं.
"अव्हो पर बोरड तर किनवटचा लावलाय, अन गाडी सावरगाव ला नेताय, आमाला आदि सांगायच नाई का मंग." त्यांच्यामद्ल्या ऐका माणसान इचारल.
"पाटी बदलायची राहिली असल, पर गाडी सावरगावलाच जाणार आज" बबन्या घुश्यात बोलला मनं.
"ओ थांबा मंग , आमाला किनवटाला जायचय" एक बाई बोलली मनं.
"नाई, आता काय थांबत नाय गाडी" बबन्या अजून पन घुश्यातच होता मनं.
बबन्या अस बोललय तवा गाडीतले सगळे लोकं लागले कि बोंबलायला, अन तुमाला तर महितेच हाय कि आपल्या गावचा रोड लई भारी, हा गडी तेवड्या दगड धोंड्यातनं गाडी बुंगाट दामटलाय, त्या बसमंदी आपले चिलख्याचे (शेजारचं गाव) गुरुजीबी होते मनं, त्यायनी सांगिटलं लोकास्नी कि आरं हे सावरगावच येडं हाय.
तर बस मधल्य्या काई लोकायला वाटल असल कि बाबा आज काई धडगत नाई , तवा एका माणसान हानली कि उडी मागल्ल्या दारानं, पार हात मोडून घेतलय मनं ते, तेच्या मागुण अजून दोगं तिघं व्ह्तेच मनं उड्या हानायला तय्यार, पन त्यचि अवस्ता बगून गप गुमान बसले मनं गाडीतच.
बायका तर लई दंगा करू लागल्या मनं, अन तवापर्यंत लोकंबी लई चिलडे मनं, दोगं जन आले कि मंग कॅबिनमंदी मारायला बबन्याला,तवा पत्तुर गाडी आल्ती कि पार  आपल्या मन्याडच्या पुलावर , ह्यो पठ्या काय केलाय गाडी हुभा केलाय साईडला अन धूम पळून गेलाय."
मंग काल सांच्यापारपासून पुलिस आल्ते धुन्डायला बबन्याला, पर काल गडी गावात नवताच त्यो आज सकाळच्यापारीच आलाय गावात, त्यो अन मी पाटीपासून संगच आलो म्हणाना, तर सगळी इस्टोरी सांगितलाय मला वाटंनं, अन तुमी यायच्या जरा आदीपासून हे नाटक सुरु हाय बगा, विशालराव"

किश्याची गोष्ट सांगून संपली तस सगळेजण उठले. सगळ्याचं लक्ष्य तिकडेच होतं. बबन्यानं पोलिसांना हैराण करून सोडलं होतं. तो आता खालीयेण्यासाठी काजू, बदाम खायला मागत होता. माझ्या मनात विचार स्पर्शून गेला कि हे आता बबन्या नाही तर त्याची गरिबी बोलत होती. त्याला पण वाटलं असेल एवढीच संधी आहे, घ्या मज्जा करून, पोलिस आपण खाली येण्यासाठी काहीही करतील.
गावात तसे मल्लखांबपट्टु होते पण कोणीच पोलिसांना मदत करत नव्हते, त्यांना पण मज्जा येत होती ह्या सगळ्यातून, आणि असही वाटत असेल कि एवढं गावाचं मनोरंजन होतंय तर का उगाच मध्ये बिब्बा घाला नाहीका?
दोन्ही पोलिस ढेरपोटे होते , जर त्यांनी मान खाली केली तर स्वताचे पाय दिसत नसतील ते काय त्या खांबावर चढणार.
पोलिसांनी बबन्याची मागणी पूर्ण केली, एका फडक्यात काजू, मनुके बांधून ती एका काठीला बांधली आणि बबन्या पर्यंत पोचेल अशी व्यवस्था केली.
बबन्याचं खाणं होई पर्यंत, बारक्या पोरांनी "माकडा माकडा हूप , तुज्या शेंडी ला तूप" म्हणत नुसता दंगा घातला होता. ती आता त्याला दगडच मारायची बाकी राहिली होती. गावकरीच त्यांना रोकत होते.
खाउन झाल्यावर पण बबन्या काही खाली येण्याचे चिन्ह दिसत नव्हते, पोलिस मग तर भलतेच तापले, त्यातल्या एकानं पोरांना हुकुम सोडला.
"ये बारक्याहो हाना रे दगडं माकडाला, येच्या मायला सकाळ पासनं लई दमविलाय हेनं"
दगड मारा म्हटल्याबरोबर एका पोरानं दगड उचलला अन जे भिरकावला बबन्याच्या दिशेने, पण तो काही बबन्याला लागला नाही. बबन्याच्या वरून जाऊन मागच्या बाजूने थांबलेल्या दिगुतात्याच्या खांद्याला लागला. तात्या ओरडले तसे सगळेच जमलेले हसायला लागले.
आता बबन्याची पण तंतरली होती, तो ओरडला.
"अये , दगडं मारु नकानबे, तुमच्या आयला, येतो बे म्या खाली, थांबा कि"
बबन्या एवढं बोलेपर्यंत बराच उशीर झाला होता, लहान पोरांनी दगडांची फायरिंगच सुरु केली होती बबन्या दगडं वाचवत खाली उतरायचा प्रयत्न करत होता अन गावकरी दगड लागू नये म्हणून पळत होते.बबन्यावर दगडांचा वर्षाव सुरु व्हायला आणि इतका वेळ रानात गेलेली त्याची माय गंगुबाई यायला एकच गाठ पडली.ती जशी आली तशी सगळ्यांनाच शिव्या द्यायला सुरुवात केली.
"मुडदा बशिवला तुजा" अस म्हणून तिनं एक लाकूड घेतलं आणि बबन्याच्या दिशेने गेली.
दगड मारणाऱ्या पोरांना वाटलं कि आता बबन्याच काही खरं नाही, आता बबन्या लई मार खातोय. म्हणून सगळी दगड न मारता तिथेच थांबून राहिली, पण जसं तिने एक, एक करून दगड मारणाऱ्याला बडवायला सुरुवात केली तसं सगळ्यांना समजलं कि बबन्याचं नाही तर आता आपलंच काही खरं नाही आणि सगळी धूम पळत सुटली.
बबन्या खाली आला तेंव्हा त्याच्या डोक्यात दगड लागून खोक पडली होती. गंगुबाई कुठूनतरी हळद आनून त्याच्या जखमेवर लावते न लावते तोच, बुटक्या पोलीसान एक काठी बबन्याच्या पार्श्वभागात लगावली.
"आयो मायो मेलो यो" करत बबन्या पळू लागला अन त्याच्या मागे गंगुबाई "पोराला मारू नका वो" म्हणत पोलिसाला विनवू लागली. अन ते बघून पाटलाच्या बाळ्याला उकळ्या फुटत होत्या.
ह्याच पाटलाच्या बाळ्या सोबत बबन्याने त्याच्या बहिणीला नको त्या अवस्तेत बघितलं होतं, अन तेंव्हापासूनच त्याच्या डोक्यावर परिणाम झाला होता, असं गावातले पोरं म्हणायचे.